अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) चौकशांना घाबरून कुणीही आमच्याकडे (शिंदे गट किंवा भाजप) येऊ नका, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये केलं. पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, "केंद्रीय तपासयंत्रणांनी सूडानं काम केलं असतं, तर न्यायालयानं कारवाई झालेल्यांना दिलासा दिला असता. सूडाच्या कारवाईची आवश्यकता काय? एवढं मोठं सरकार बनवलं, एकतरी सूडाची कारवाई केली का? एकानं तरी सांगितलं का, की ईडीची नोटीस पाठवली म्हणून तिकडे गेलो?"
"ईडीच्या भीतीनं कुणीही इकडे येऊ नका. दडपणाखाली येऊ नका," असंही शिंदे म्हणाले. ते म्हणालेत ना, कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. चौकशीला सामोरं जाऊद्या. त्यातून पुढे येईल ते कळेलच."