शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 2022 साली ठाकरे गटात बंड करून 40 आमदारांना घेऊन दोन गट केले. ठाकरेंच्या गटात सुषमा अंधारे यांनी प्रवेश केला.नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, दीपाली सय्यद भोसले, शीतल म्हात्रे या मागे पडल्या आणि अंतर्गत वाद सुरु झाल्यामुळे दीपाली सय्यद, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला.
"1998मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवेसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत मला खूप चांगलं काम करता आलं. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांनी स्पष्ट निकाल दिला आहे की एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे," असं नीलम गोऱ्हे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
केंद्रात NDA आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरी कायद्याविषयी सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची वरील मुद्द्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे, असंही गोऱ्हे यांनी म्हटलं.