शरद पवारांनी घेतलेली बैठक अनधिकृतच - प्रफुल्ल पटेल

शुक्रवार, 7 जुलै 2023 (18:10 IST)
शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेली कालची (6 जुलै) बैठक अनधिकृतच होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
 
आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कालच या सर्व नेत्यांना शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत निलंबित केलं होतं.
 
प्रफुल्ल पटेल म्हणाले, "30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली, त्या बैठकीत अनेक लोक उपस्थित होते. ही बैठक दैवगिरी बंगल्यावर झाली. पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. त्यात रा. काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते होते. त्या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते अजित अनंतराव पवार यांना आपला नेता म्हणून निवडलं. त्यामुळे अजित पवार यांनी 2,3 निर्णय घेतले. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नेमलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या पत्राद्वारे आपण विधानसभेचे अजित पवार हे नेते आहेत असं सूचित केलं. तसंच आम्ही पक्ष म्हणून अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून नियुक्त केलं."
 
विधानपरिषदेत अमोल मिटकरी प्रतोद झाल्याचं आम्ही परिषदेच्या उपाध्यक्षांना कळवलं. त्याच दिवशी आम्ही आमदार आणि मान्यवरांच्या अॅफिडेव्हिटसह निर्वाचन आयोगाला आमची याचिका दाखल केली आहे. हा विषय 30तारखेलाच विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाकडे गेला आहे.
 
आम्ही पक्ष आहोत. आणि म्हणून सर्व चिन्हासारखे विषय आम्हाला मिळाले पाहिजेत. निवडणूक आयोगाकडे ही मागणी आम्ही केली आहे. ही फूट नाही. हा वेगळा गट नाही. हा सरळसरळ पक्षातील बहुमत अजित पवार यांच्यामागे उभे आहे. त्यांना बहुमताने पाठिंबा आहे हे आम्ही आयोगाकडे 30 तारखेला दाखल केलं आहे.
 
मी स्पष्ट करतो की, काल दिल्लीत एक राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्याला मी दुसरं नाव देणार नाही. ती पक्षाची अधिकृत बैठक नव्हती. आमच्या पक्षाच्या घटनेनुसार नियम तयार केलेले आहेत. त्याआधारावरच सर्व होते.
 
राष्ट्रवादीत उभी फूट, अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष बदलला, नवे पदाधिकारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अजित पवार गटाकडून आज (3 जुलै) पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात खासदार प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही नियुक्त्यांची घोषणा केली.
 
अजित पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. तसंच, प्रवक्तेपदी आमदार अमोल मिटकरी यांची नियुक्ती करण्यात आलीय.
 
दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी बंड करणाऱ्या नेत्यांवर आणि शपथविधीला उपस्थित असलेल्या नेत्यांवर कारवाई केलीय.
 
तसंच, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षीय शिस्तभंगाची कारवाई केलीय.
 
मात्र, या सर्व कारवाया अजित पवार गटानं फेटाळून स्वत: नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
 
सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेलांची घोषणा
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या गटाची भूमिका स्पष्ट केली.
 
यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सामील झालो. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाबद्दल आम्हाला सूचना करायची होती. आम्ही जनतेला सूचित करू इच्छितो. संघटनात्मक दृष्टीने मोठ्या नियुक्त्या करण्याची सुरुवात आम्ही केली आहे.
 
“21 जून ला मला पक्षाने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. पक्षाचं आधी जे अधिवेशन पार पडलं होतं. तेव्हा मी उपाध्यक्ष मी निवडून आलो होतो. महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील आम्ही नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या. तरी काहीतरी व्यवस्था असावी म्हणून प्रदेशाध्यक्षापदाची जबाबदारी दिली होती. मी आज त्यांना कळवलं आहे की त्यांना जबाबदारीतून मुक्त केलं. त्याऐवजी मी सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्षपद म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांनी तात्काळ कामाला लागावं अशी आम्ही सूचना करत आहोत. हा बदल झाल्यानंतर जो बदल करायचा आहे तो करायचा अधिकार सुनील तटकरेंना असेल.”
 
“आम्हाला संख्याबळ सांगण्याची गरज नाही. बहुसंख्य आमदार आहेत म्हणून अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत.” असं ते म्हणाले.
 
“आमची पवार साहेबांना विनंती आहे की हे चित्र समाप्त व्हावं आणि त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर रहावे अशी इच्छा आहे.” असंही ते म्हणाले.
 
“कुठल्याही व्यक्तीच्या अपात्रतेची कारवाई पक्ष करू शकत नाही. ते अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांना आहे. अजितदादा पवार यांना आमदारांनी पक्षाचा विधिमंडळाचा नेता म्हणून नियुक्त केलं आहे. आम्ही अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून नियुक्त केली आहे.”
 
अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमलं असं कळलं. पण विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. ज्याची जास्त संख्या त्याचा विरोधी पक्षनेता असतो. या नियुक्त्या करून आमदारांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करण्याचं काम केलं आहे.
 
"आम्हीच पक्ष आणि चिन्ह आहोत. आम्हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहोत.राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. आम्ही एकत्र काम करतोय. राज्याच्या विकासासाठी काम करतोय.नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, देश आगेकूच करतोय, त्याला पाठिंबा देत काम सुरू राहील.
 
"विकासकामांसाठी निधी लागतो, परवानग्या लागतात त्याचा फायदा राज्याला व्हावा. केंद्र आणि राज्य सरकार वेगळ्या विचारांचं असेल तर विकास कामांच्या निधीच्या बाबतीत कमतरता राहते.”
 
अपात्रतेच्या कारवाईबद्दल अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात आम्ही कालच पत्र दिलं आहे.”
 
पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करू - तटकरे
सुनील तटकरे यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचे आभार मानले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलले.
 
सुनील तटकरे म्हणाले, “मला प्रदेशाध्यक्षापदाचं काम दिलं आहे. मी या आधी काम केलं आहे. आज पुन्हा ही जबाबदारी मला दिली आहे. पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करू.
 
"आम्ही 5 तारखेला एक बैठक ठेवली आहे. तिथे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील. महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे आमच्याबरोबर असतील.”
 
या पत्रकार परिषदेला छगन भुजबळ, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, धनंजय मुंडे आणि अन्य नेते उपस्थित होते.
 
जितेंद्र आव्हाड : 'शरद पवारांनी तटकरे-पटेलांना निलंबित केलंय'
जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, "प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलंय. त्यामुळे त्यांना कुणाच्या नेमणुका करण्याचा कुठलाच अधिकार नाही."
 
आव्हाड पुढे म्हणाले की, "तुम्ही शरद पवार यांना अध्यक्ष मानता, मग त्यांनी तटकरे आणि पटेलांवर केलेली कारवाई मान्य करता की नाही?"
 
"बाहेर पडलेला गट म्हणजे पक्ष नाही. 40 आमदारांवरून तुमचा अध्यक्ष होऊ शकत नाही. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांना शरद पवारांसोबतच यावं लागेल," असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
 
आव्हाड म्हणाले, "माझ्या फोटोला काळं फासा किंवा काहीही करा. माझ्या रक्तात गद्दारी नाही. माझ्या रक्तात शरद पवार आहेत. तुम्हाला मोठं करणाऱ्याला एकटं पाडणं मला जमणार नाही. तत्वांपासून आम्ही दूर जाणार नाही, आम्ही शरद पवारांसोबतच राहणार." 
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती