नाशिकला मिळणार १०० मे.ट. ऑक्सिजन, २००० रेमडेसिवीर, भाजप नेत्यांचे मुंबईतील आंदोलन यशस्वी

शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (07:59 IST)
नाशिक जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सापत्न वागणूक मिळत असल्याचा निषेधार्थ भाजप नेते एकवटले आहेत. त्यामुळेच महापौर, आमदार आणि खासदारांसह भाजप नेत्यांनी थेट मुंबईत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
 
वाढत्या रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही सरासरी ४०० ते ५०० रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरवठा नाशिक जिल्ह्याला होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही. तसेच नाशिक जिल्ह्यासाठी १२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असतांना तो फक्त सरासरी ७० मेट्रिक टनच मिळत आहे. परिणामी, अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावत आहेत.
 
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापौर सतीश कुलकर्णी, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक प्रशांत जाधव, सभागृह नेते सतिश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी एफडीएचे सेक्रेटरी विजय सौरभ यांचेशी चर्चा केली. त्यांना नाशिक जिल्ह्याची परिस्थिती अवगत केली व जो पर्यंत ह्यावर योग्य तोडगा निघत नाही, तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका सर्व शिष्टमंडळाने घेतली. त्याची दखल घेत नाशिकसाठी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन आणि सुमारे २००० रेमडीसीवर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यास देण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले.
 
तसेच ही बैठक चालू असतांना एफडीएचे आयुक्त परिमल सिंग, एफ डी. ए. महाराष्ट्र उपायुक्त विजय वाघमारे, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेसह  सर्व शिष्टमंडळाची तातडीने व्हिडिओ कॉफरन्स घेणात आली. नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी वाढीव रेमडीसीवर व ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन घेण्यात आले. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक रुग्णांची हेळसांड थांबणार असून त्यांना पुरेशा प्रमाणात उपचारासाठी रेमडीसीवर व ऑक्सीजन मिळण्यास मदत होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती