नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसाद झगरे व वैभव वाकचौरे असे धरणात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून प्रतीक वाकचौरे यास स्थानिकांना वाचविण्यात यश आले आहे. नाशिकहून हे तीन मित्र रविवार अंजनेरी परीसरात पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अंजनेरी गडासह पाठीमागच्या बाजूस असलेल्या प्रति केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर अंजनेरी गावाजवळ असलेल्या धरणात हे तिघेजण आंघोळीसाठी गेले. यावेळी तिघेही पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. यानंतर स्थानिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेत काठावर असलेल्या एकाला धरणातून बाहेर काढले. तर दोघेजण पाण्याच्या लाटेत खूप पुढे वाहून गेल्यामुळे त्यांचा बुडून त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत घेण्यात आली. दरम्यान, यानंतर अंजनेरी गावातील पोहणाऱ्या युवकांनी पाण्यात उड्या घेत शोधमोहीम सुरू केली असता प्रसाद झगरे याचा मृतदेह सापडला. तर दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम रविवारी अंधार झाल्यामुळे थांबविण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु झाली असून याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.