याप्रकरणी कारवाई येण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्यानंतर अवघ्या २४ तासांतच हा निर्णय मागे घेतला गेला. तत्पूर्वी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, डॉक्टरांना सोसाव्या लागत असलेल्या मानसिक व सामाजिक दबावामुळे रुग्णसेवा बंद करण्याची परवानगी केवळ मागितली होती. आता आयुक्तांनी असोसिएशनच्या मागण्या, समस्या सामंजस्याने सोडविण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे कोविड रुग्णसेवा अखंडीतपणे सुरू राहील असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर यांनी स्पष्ट केले.
शहरात कोरोना रुग्णांकडून लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ही कथित लूट रोखण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. मात्र त्यानंतरही जादा बिल आकारण्याच्या तक्रारी कायम असल्यामुळे पालिकेने कडक कारवाईचा इशारा दिला होता. तसेच सामाजिक संघटना कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केल्याचे बघून हॉस्पिटल ओनर असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत कोरोना रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले होते.