शिवराज्याभिषेक सोहळा’ साजरा करण्यासाठी राज्य सरकारचे नियम जाहीर

शुक्रवार, 4 जून 2021 (08:28 IST)
Photo : Twitter
संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून निर्देश आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट अजूनही डोक्यावर असल्यामुळे राज्यात शिवस्वराज्य दिन कशाप्रकारे साजरा करायचा, याची नियमावली सादर करण्यात आली आहे. ग्राविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
 
भगवा स्वराज्यध्वज संहिता – ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. ध्वज हा २ फुट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन,जगदंब तलवार,शिवमुद्रा,वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
 
शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता – शिवशक राजगंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी १५ फुल उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान ५ ते ६ फुटाचा आधार द्यावा.
 
आवश्यक साहित्य – सुवर्ण कलश, पुष्पहार, गादी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद-कुंकू, ध्वनीक्षेपक,
 
६ जुन रोजी सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्या. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुख,समृद्धी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजगंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा “सुवर्ण कलश” बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार,गाठी, आंब्याची डहाळी बांधावी व शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तदनंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणुन सांगता करावी.
 
सूर्यास्तमाला- शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवून द्यावा.
 
शिवस्वराज्यदिन हा हॅशटॅग ट्रेंड करू : मुश्रीफ
छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रात शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा होत आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजीमहाराज यांना यादिवशी प्रत्येकजण अभिवादन करीत असतो. या दिनाचे औचित्य साधून सर्व मिळून #शिवस्वराज्यदिन हा हॅशटॅग ट्रेंड करू या… #ShivSwarajyaDin असे आवाहन राज्यातील तरुणांना करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात यावा असे आवाहन ग्राविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती