बहिणीनेच केली मृत बहिणीच्या बँक खात्यातील 17 लाखांची रोकड लंपास

मंगळवार, 5 जुलै 2022 (21:15 IST)
नाशिकमध्ये  मृत बहिणीच्या नावे असलेले शेअर्स व बँकेतील रोख रक्‍कम अशी एकूण 17 लाख रुपयांची रोकड बहिणीनेच काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत नितीन बाळकृष्ण जोशी (वय 52, रा. आनंद अपार्टमेंट, अंबड वजन काट्याच्या मागे, नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी नेहा सोनटक्के व भाचा योगेश टिल्‍लू हे नितीन जोशी यांची पत्नी पल्‍लवी जोशी ऊर्फ ज्योत्स्ना रमेश टिल्‍लू वय 47 यांची बहीण व भाचा आहे. जोशी यांची पत्नी पल्‍लवी यांचा दि. 5 जानेवारी 2022 रोजी मुंडेगाव फाटा येथे कार अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, पार्थिवाचे शवविच्छेदन करताना मृत महिलेजवळ असलेली पर्स व मोबाईल नेहा सोनटक्के व योगेश टिल्‍लू यांनी स्वत: काढून घेतले.

पर्समध्ये असलेल्या डायरीतील शेअर्सच्या नोंदी व मोबाईलचा वापर करून त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी परस्पर पल्‍लवी जोशी यांच्या खात्याची माहिती मिळवून स्टेट बँकेच्या विल्होळी शाखेतून दि. 5 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2022 या कालावधीत वेळोवेळी पैसे काढून सुमारे 17 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नेहा सोनटक्के व योगेश टिल्‍लू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती