मेळघाटातील हरिसाल येथील आरएफओ ३४ वर्षीय दीपाली चव्हाण यांनी बंदूकीतून छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली. हा प्रकार हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी घडला. 'त्या दोषी अधिकाऱ्याला माझ्या डोळ्यांसमोर फाशी द्या', असा आर्त टाळो दीपाली यांच्या आईने फोडला. दीपाली यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात नमूद मजकुरानुसार, डीसीएफ विनोद शिवकुमारच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळेच ग्रामीण पोलिसांनी डीसीएफ शिव कुमारला बेड्या ठोकल्या आहेत.
मुलीला पाहून त्यांच्या आईने टाहो फोडला. माझ्या मुलीचा जीव गेला आहे. डीसीएफ शिव कुमारला माझ्या डोळ्यादेखत फासावर लटकवा, असा टाहो दीपाली यांच्या आईने फोडला होता. दीपाली यांची आई, पती व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
याप्रकरणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही तक्रार केली होती. मात्र, रेड्डींनी कारवाई केली नाही. त्यामुळे रेड्डींवरही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी दीपाली चव्हाण यांच्या संतप्त नातेवाइकांनी आक्रोश केला. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली नव्हती.