कोरोना निर्बंध झुगारत भावी PSIचे सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल

शनिवार, 27 मार्च 2021 (16:32 IST)
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात कोरोनाच्या निर्बंधांचे स्पष्टपणे उल्लंघन झालेले दिसत आहे. भावी पोलिस उपनिरीक्षकांनी मोठ्या जल्लोषात सेलिब्रेशन केल्याचे यात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम केवळ सर्वसामान्यांनाच आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
महाराष्ट्र पोलीस अकाडमीमधील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल असून नाशिकमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांना खुद्द पोलीसांकडूनच हा निष्काळजीपणा कशाला ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. नियम सर्वांना सारखेच हवेत अशा सोशल मीडियावर काही नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. विशेष म्हणजे येत्या 30 तारखेला याच पोलीस उपनिरीक्षकांचा दिक्षांत समारोह होणार आहे. तेव्हा आणखी काय गोंधळ होईल ? अशी विचारणा करण्यात येत आहे.
नाशिक शहरातील पोलिस अकादमीत राज्याभरातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. याठिकाणी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सध्या महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये अनेक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली होती. या सर्वांना ठक्कर डोम येथील कोवीड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले होते.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील शुक्रवारी  जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकार्‍यांसमवेत नाशिक शहरातील विविध भागांचा दौरा करून व्यापारी, छोटे- मोठे व्यावसायिक, दुकानदार आणि सर्व नागरिकांना कोरोना बाबत काळजी घेण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही नाशिक शहरातील त्रंबकरोड वरील पोलिस अकादमीत पोलीस प्रशिक्षणार्थी प्रचंड संख्येने एकत्र जमून भन्नाट डान्स करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने सर्व नागरिकांनी मधून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच कोरोना नियमांसह कायद्याची पायमल्ली होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती