नाशिकमध्ये तूर्तास लॉकडाऊन नाही; पालकमंत्री भुजबळ मैदानात

शनिवार, 27 मार्च 2021 (08:30 IST)
नाशिक शहरात दररोज हजारो नवे कोरोनाबाधित आढळून येत असतानाही नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. तसेच, प्रचंड रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधा अपुर्‍या पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळांनी शुक्रवारी सायंकाळी नवीन नाशिकसह शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत रस्त्यावर उतरत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही पालकमंत्री भुजबळांनी दिला.
 
नाशिकमध्ये शुक्रवारी चार हजाराहून अधिक  नवे कोरोनाबाधित आढळून येत असल्याने शहरातील वातावरण गंभीर वळणावर आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी नाशिक लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह महापालिका प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्याकडून लॉकडाऊन करावे किंवा नाही, याबाबतचा अहवाल मागवला आहे.
 
कोरोनाचा फैलाव वाढत असल्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांचा मृत्यूदरही वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर आता लॉकडाऊन करण्याच्या मानसिकतेत प्रशासनासह महापालिकेचे सत्ताधारीही आले आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन भवनात तातडीची बैठक बोलावली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती