लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून २३ वर्षीय युवकाने शेतात गवत आणायला गेलेल्या मुलीच्या आईवर खुरप्याने सपासप वार करून खून केल्याची घटना आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या ११ तासात खुनाचा उलगडा करत आरोपीला गजाआड केले आहे. लता महादेव परीट असं हत्या झालेल्या (वय ४२) महिलेचं नाव आहे.तर गुरुप्रसाद देवराज माडभगत असं अटक केलेल्या युवकाच नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुप्रसाद माडभगत याने काही दिवसांपूर्वी लता परीट यांच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती.पण लता परीट यांना विवाहस्थळ पसंत नसल्यानं त्यांनी मुलगी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे गुरुप्रसाद लता यांच्यावर नाराज होता.लता आपल्या दोन्ही मुलांसह शुक्रवारी शेतात गवत आणावयास गेल्या होत्या.त्यानांतर शेतातील गवत कापून मुलांकडे देत, दोघांनाही घरी पाठवून दिलं.आणखी थोडं गवत कापून मीही येते असं त्यांनी मुलांना सांगितलं.शेतात लता एकट्याच असल्याचे पाहून गुरुप्रसादने खुरप्याने लता यांच्या तोंडावर,मानेवर रागानं बेभान होऊन अनेक वार केले.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतातून आई बराच वेळ झाला तरी न आल्याने मुलांनी आणि ग्रामस्थांनी लता यांची शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना जनार्दन देसाई यांच्या गावंधर नावाच्या शेतातील उसात लता यांचा मृतदेह आढळून आला.लता यांचा मृतदेह दिसू नये म्हणून तो गवतात आणि पाचटांन लपवून ठेवला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला.अवघ्या ११ तासांत घटनेची उकल करत गुरुप्रसाद याला अटक केली.त्याला आजरा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं असता,न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.