महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता वादात सापडली आहे. या योजनेत सुमारे १४ हजार पुरुषांनीही गरीब महिलांसाठीच्या या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यानंतर आता या लाभार्थ्यांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः पुष्टी केली की २६ लाख ३४ हजार लाभार्थ्यांना विविध कारणांमुळे या योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आले. अर्जांच्या तपासणीत असेही समोर आले की अनेक ठिकाणी पुरूषांनीही या योजनेसाठी अर्ज केले आणि त्यांना लाभ मिळाला.
यापूर्वी, मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली होती की अर्जांच्या तपासणीत काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे, काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आढळले आहे आणि काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याचेही समोर आले आहे. या माहितीच्या आधारे, या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ जून २०२५ पासून तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. याशिवाय, जून २०२५ महिन्यासाठीचा सन्मान निधी सुमारे २.२५ कोटी पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे.