मुंबई लोकल ट्रेन रुळांवर पाणी साचल्याने थांबल्या आहेत. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन सेवा अंशतः बंद करण्यात आल्या आहेत, तर रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. शाळा महाविद्यालय, कार्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली असून लोकांना आवश्यक असल्यास घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे, सीएसएमटी आणि ठाणे स्थानकादरम्यानच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ठाणे ते कर्जत, ठाणे ते खोपोली आणि ठाणे ते कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा चालवल्या जात आहेत. मानखुर्द ते पनवेल दरम्यानही शटल ट्रेन चालवल्या जात आहेत.
मुंबईत सततच्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे आणि वाहतूक ठप्प झाली आहे. मिठी नदीलाही पूर आला आहे, त्यामुळे कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसर रिकामा करण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये आणि सरकारच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.