विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे

शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (07:55 IST)
Monsoon Session विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
 
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज
 
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 6 तास 53 मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 96.33 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 86.99 टक्के इतकी होती.
 
विधानपरिषदेत अधिवेशन काळात 64 तारांकित प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तरे दिली. एकूण प्राप्त 677 लक्षवेधी सूचनांपैकी 147 स्वीकृत करण्यात आल्या तर 58 लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. विधानपरिषदेत 03 विधेयके पूर:स्थापित करण्यात आली आणि ती संमत करण्यात आली. विधानसभेने संमत केलेली 13 विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली. तर 2 विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली. पैकी सभागृहात नियम 260 अन्वये एकूण प्राप्त सूचना 4 सूचना मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्वांचे आभार मानले.
 
विधानसभेत प्रत्यक्षात 109 तास 21 मिनिटे कामकाज
 
विधानसभेत प्रत्यक्षात 109 तास 21 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 8 तास 24 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.43 टक्के होती तर एकूण सरासरी उपस्थिती ही 82.90 टक्के इतकी होती.
 
विधानसभेत अधिवेशन काळात 47 तारांकित प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तरे दिली. दोन अल्पसूचना प्रश्न आणि एका विषयावरील अल्पकालिन चर्चा विधानसभेत झाली. एकूण प्राप्त 1890 लक्षवेधी सूचनांपैकी 515 स्वीकृत करण्यात आल्या, तर 98 लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. विधानसभेत पुर:स्थापित 24 शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यातील 16 संमत झाली. विधानपरिषदेने संमत केलेली 3 विधेयके विधानसभेत संमत करण्यात आली. पैकी सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 4 सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी 3 सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती