सध्या सुरू असलेल्या पावसाळा अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी असल्याने राजधानी एक्स्प्रेसने ना. भुजबळ नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे, कैलास मुदलीयार, योगेश निसाळ, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख आदींनी त्यांचे स्वागत केले.
शरद पवार यांच्या नंतर आदित्य ठाकरे येवला येथे येत असल्याबाबत विचारले असता ना. भुजबळ म्हणाले की, निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते फिरत आहे. अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी असल्याने ठाकरे यांचा दौरा असावा. मात्र, आदित्य ठाकरे हे पंधरा वीस वर्षांपूर्वी येवला येथे आले असते तर तेव्हाचा व आत्ताचा फरक लक्षात आला असता.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील रहिवासी यांनी मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केल्या बाबत सांगितले की, सरकार या बाबत सकारात्मक आहे, भविष्यात आवश्यक ते करता येईल कारण खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सध्या नागरिक पावसाची, धबधब्याची मजा घेण्यासाठी लहान मोठ्या गड किल्ल्यावर जातात.
त्र्यंबकेश्वर जवळील पहिने या ठिकणी लोक गर्दी करतात. आपल्या कडे पाऊस जोर धरेल. कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ना. भुजबळ म्हणाले.