फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी निधीची खैरात, बाळासाहेब थोरात यांची टीका

मंगळवार, 25 जुलै 2023 (08:05 IST)
सरकारने सादर केलेल्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यात आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी भरघोस निधीची खैरात वाटली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना निधीच दिलेला नाही. हा तेथील जनतेवरील अन्याय आहे. हा भेदभाव दूर करा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत दिला.
 
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना निधीच्या असमान वाटपाची यादीच बाळासाहेब थोरात यांनी दाखवली. हे सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. एका वर्षात फक्त पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून १ लाख २० हजार कोटी रुपये वाटले गेले. राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. एकूण अर्थसंकल्पाच्या ५ ते १० टक्के पुरवणी मागण्या असाव्यात, असा संकेत आहे मात्र हा संकेत या सरकारने पायदळी तुडवला आहे. आम्हीदेखील या अगोदर सरकारमध्ये राहिलेलो आहोत आणि विरोधी पक्ष म्हणूनही आम्ही कामकाज केलेले आहे; पण इतिहासात कधीच झाले नव्हते अशा घटना या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून घडलेल्या आहेत, अशी टीका थोरात यांनी केली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती