पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेस लढवेल असं म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे या जागेवरुन दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत असतानाच ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी या वादात उडी घेतली आहे. राऊत यांनी या पोटनिवडणुकीवरुन एक सूचक ट्विट करत दोन्ही नेत्यांना सल्ला दिला आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कसेल त्याची जमीन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर कसब्याप्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल.”पुणे लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला असून, यासंदर्भात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळी विधानं करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राऊतांनी हे ट्विट करुन आघाडीला सबुरीचा सल्लाही दिला आहे.