जनसंसद शक्तिशाली करा की, सरकार पडेल, देशाला वाचवण्याचा दुसारा रस्ता नाही

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (22:57 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि सरकार टीकास्त्र सोडलं.  “सर्वजण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्याच्या पाठी पडले आहेत. कोणतंही सरकार स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार समजत असेल. तर जनसंसद शक्तिशाली करा की, सरकार पडेल. देशाला वाचवण्याचा दुसारा रस्ता नाही.”,असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. “काँग्रेस असो की भाजपा कोणत्याही पक्षाकडे देशाचं उज्ज्वल भविष्य नाही. देशात बदल घडवायचा असेल, तर सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यावर जनसंसदेच्या माध्यमातून दबाव आणला गेला पाहीजे. २०११ च्या लोकपाल आंदोलनात आम्ही हाच संकल्प घेऊन टिम तयार केली होती. मात्र काही लोकांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि टिम विस्कटली. कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी राज्यपाल, तर काही जण मंत्री झाले. यामुळे देशाचं नुकसान झालं.”,असा निशाणा अण्णा हजारे यांनी साधला.
 
“काही जण माझ्यावर मुद्दाम टीका करतात. पण मी तिथे लक्ष देत नाही. ते माझं काम नाही. माझं काम समाज आणि देशासाठी आहे. सत्य कधीच पराजित होत नाही. माझा काही स्वार्थ नाही. मी ४६ वर्षांपासून मंदिरात राहात आहे. माझ्याकडे खाण्यासाठी ताट आणि झोपण्यासाठी बिछाना इतक्यात गोष्टी आहेत. मला कोणत्याच राजकीय पक्षाशी देणंघेणं नाही. मी फक्त देश आणि समाजाचा विचार करतो”,असं देखील अण्णा हजारे यांनी सांगितलं. “मी कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आंदोलन करत आहे. २३ मार्च २०१८ आणि ३० जानेवारी २०१९ रोजी मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. दिल्लीत गेल्या ९ महिन्यांपासून जे शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मी एक दिवसाच उपोषण देखील केलं. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत जराही गंभीर नाही. कृषी उत्पादनावर सी२ अधिक ५० टक्के एमएसपी लागू केली पाहीजे. यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती गठित करण्याचं लिखित आश्वासन दिलं आहे”,असंही त्यानी पुढे सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती