दिल्लीत पावसाळ्याच्या झड्यांनी 16 दिवसांची तहान भागवण्यासा सुरुवात केली आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने देशभरासाठी अलर्ट जारी केला आहे. आज महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात मुसळधार ते जोरदार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तास कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत, या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच येथे 200 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि आसामसाठी केशरी चेतावणी आहे, म्हणजेच मुसळधार पावसापासून सावध रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या आठवड्यामध्ये कोकणात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये सोमवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून या काळात तुरळक ठिकाणी 20 सेंटीमीटरहून जास्त पावसाचा अंदाज आहे.
रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पावसानं झोडपून काढलं आहे. तर धुळे, सातारा, सोलापूर, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत देखील मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहे. आज पुन्हा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील चोवीस तासात दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात 12 ते 15 जुलै दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी कोकण आणि गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच 13,14 जुलै रोजी विदर्भ, कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र,घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आज सातारा, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आकाशात विजांचा गडगडाट होत असताना घराबाहेर पडून नये अथवा मोठ्या झाडाच्या आडोशाला उभा राहू नये, असा सल्ला हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज कोरडं हवामान असण्याची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.