विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असणार,ते ज्यांना निवडतील ते आम्हाला मान्य असेल - शरद पवार

मंगळवार, 13 जुलै 2021 (08:27 IST)
महाराष्ट्रात नवीन विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे असेल यावरुन बरेच कयास लावले जात होते. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात आम्ही तीन पक्षांनी मिळून सरकारचा निर्णय केला आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि ते काँग्रेसकडेच राहील. इतर कुणी बोलायचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आम्हा तिन्ही पक्षांना मान्य आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथे बोलताना शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी अध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली असल्याचे सांगितले होते. त्यावर पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले.
 
शरद पवार पुढे म्हणाले की, पावसाळी अधिवेशनादरम्यान, भाजप आमदारांनी जो गैरव्यवहार केला त्यावरुन पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई योग्य असून कायदेशीर झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.
 
केंद्र सरकारने नुकतेच आपल्या मंत्रिमंडळात एका नवीन सहकार खात्याची निर्मिती केली आहे. हे खाते गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, मल्टिस्टेट बॅँक हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मात्र, सहकार मंत्रालय हा विषय नवीन नाही. मी दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री होतो. तेव्हाही सहकार हा विषय होता आणि आजही आहे. काही माध्यमांनी मात्र केंद्रीय खात्यामुळे राज्यातील सहकार चळवळीवर परिणाम होईल असे जे लावून धरले आहे त्यात तथ्य नाही, असेही पवार म्हणाले. समान नागरी कायदा केंद्र सरकारचा विषय आहे. सरकार जोवर निर्णय घेत नाही तोवर भाष्य करणे उचित होणार नाही. कारण निर्णयाचे अधिकार केंद्राकडे आहेत, असेही पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती