महाराष्ट्र ISIS मॉड्यूल : पुणे-मुंबईतून अटक, पण नेमका कट काय होता?
रविवार, 13 ऑगस्ट 2023 (10:10 IST)
18 जुलै 2023 च्या रात्री गस्तीवर असणाऱ्या पुणे पोलिसांच्या पेट्रोलिंग टीममच्या जवानांना तेव्हा कल्पना नव्हती की, चौकशीसाठी ज्यांना ते थांबवत होते, त्याचा संबंध मोठ्या कटाशी असेल.
कोथरुडच्या बधाई चौकामध्ये पोलिस मार्शल्स फिरत असतांना त्यांना तिघं जण संशयित एक दुचाकी चोरताना दिसले.
संशय आला म्हणून त्यांना हटकलं. मग पळापळी आणि पकडापकडी सुरु झाली. तिघांपैकी एक पळाला, पण बाकी दोघे मात्र तावडीत आले.
पोलिसांना तेव्हा कल्पना नव्हती हे कोण आहेत. पकडून जेव्हा पोलिस स्टेशनला त्यांना नेण्यात आलं. सुरुवातीला त्यांनी उडवा-उडवीची उत्तरं दिली. पण नंतर चौकशीत त्यांची खरी नाव समोर आली.
त्यानंतर पुणे पोलिसांच्या तपासानं वेगळंच वळण घेतलं. त्या वळणानं गेल्या महिन्याभरापासून केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात गंभीर दखल घेतली आहे. 'महाराष्ट्र आयसिस' मोड्युलमुळे पुणे एकदम चर्चेत आलं आहे. आणि आता या तपासाचा विस्तार पुण्यापासून मुंबई, कोकण, ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
इराक-सिरियाच्या प्रदेशात जन्मलेल्या 'आयसिस' (ISIS) या संघटनेच्या कारवायांचे पडसाद गेल्या दशकभराच्या काळात जगभरात उमटले.
आता 'आयसिस'च्या विचारधारेनं प्रभावित होऊन काही संघटना तरुणांना सोबत घेऊन कट रचत आहेत असे आरोप ठेवत भारतीय तपास यंत्रणांनी गेल्या महिन्याभराच्या काळात केलेल्या या कारवाईकडे गंभीरपणे पाहिलं जात आहे.
त्यातही पुण्या-मुंबईत झालेल्या अटकांमुळे त्याचं गांभीर्य अधिक आहे. 18 जुलैपासून सुरु झालेला तपास गेल्या महिन्याभरात पसरत गेला आहे.
दोन तपास यंत्रणांच्या या दोन स्वतंत्र वेगवेगळ्या कारवाया आहेत. एक महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) यांनी केलेला तपास आणि त्याच वेळेस राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांनी सुरु केलेला एका अन्य प्रकरणातला तपास.
आता या दोघांमध्ये काही समान दुवे आढळल्यावर आणि त्याचा विस्तारही वाढल्यावर हा संपूर्ण तपास NIA कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय पुणे न्यायालयानं दिला आहे.
तपास हस्तांतरित झाल्यावर शुक्रवारी 11 ऑगस्ट रोजी NIA नं या प्रकरणातली एकूण 11 वी अटक केली आहे. ठाण्यातील पडघा इथून शामिल नाचन या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हे अटकसत्र अजून काही दिवस असंच चालू राहण्याची शक्यता आहे.
आजवर पुण्याशी संबंधित या दोन्ही प्रकरणांमध्ये, ज्याला NIA ने 'महाराष्ट्र ISIS मॉड्यूल' असं म्हटलं आहे, त्यात एकूण 10 जणांना अटक झाली आहे.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात आणि देशात घातापात घडवून आणण्याचा कट रचला जात होता आणि त्यासाठी तरुणांना विचारधारेशी जोडून, त्यांना ट्रेनिंग देऊन अतिरेकी कारवायांसाठी तयार केलं जात होतं.
महिन्याभराच्या काळात दोन तपास यंत्रणांचा तपास कसा पसरत गेला आणि त्याचं केंद्र पुणे कसं राहिलं, हे पाहणं आवश्यक ठरेल.
गस्तीवरच्या पोलिसांची कारवाई आणि ATS ची कारवाई सुरू
18 जुलैला गस्तीवरच्या पेट्रोलिंग टीमनं एक बाईक चोरताना दोघा जणांना रात्री पकडलं. त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला आणि तो अद्याप फरार आहे. पण पुणे पोलिसांनी पुढची चौकशी जेव्हा सुरु केली आणि रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली, तेव्हा काहीच वेळात समोर आलं की हे काही साधेसुधे बाईकचोर नाहीत.
पकडले गेल्यांची नावं होती 23 वर्षांचा मोहम्मद इम्रान युसूफ खान आणि 24 वर्षांचा मोहम्मद युनूस याकूब साकी. हे दोघेही पुण्याचा कोंढवा भागात रहात होते. पण ते मूळचे पुण्याचे नाहीत. ते दोघेही मध्य प्रदेशातल्या रतलामचे आहेत.
पोलिसांच्या तपासात हे पुढे आलं हे दोघेही आरोप हे 'वॉण्टेड' आहेत आणि राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ने यापूर्वीच त्यांना फरार म्हणून घोषित केलं आहे. त्यांच्यावर 5 लाख रुपयांचे बक्षिसही NIA नं घोषित केलेलं आहे. हे दोघेही रतलाममधून फरार झाल्यावर पुण्यात येऊन वेगळ्या नावानं रहात होते.
पण पुण्यात येण्याअगोदरच त्यांचा दहशतवादी कारवायांशी संबंध होता असं NIA चं म्हणणं आहे. 2022 पासून NIA ही राजस्थानत सापडलेल्या स्फोटकांच्या तपास करत होती. या प्रकरणार रतलामच्या या दोघांचं नाव आलं होतं, पण दोघेही तेव्हापासून फरार होते.
"इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे 'सफा टोळी'चे सदस्य आहेत जे फरार होते. NIA नं त्यांना 'मोस्ट वॉण्टेड' घोषित केलं होतं. एप्रिल 2022 मध्ये राजस्थानात एका कारमध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात ते संशयित होते," असं NIA नं ५ ऑगस्टच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार 'सफा' नावाची संघटना ही ISIS च्या विचारधारेनं आणि कृत्यांनी प्रभावित आहे. रतलाम मधल्या त्यांच्या कारवायांबाबत NIA पहिल्यापासून त्यांच्या मागावर होती.
यंत्रणांनी याला 'महाराष्ट्र ISIS मोड्यूल' असं म्हटलं असलं तरीही परदेशातल्या या दहशतवादी संघटनेशी त्यांचे संबंध आहेत का याचा तपास अद्याप सुरु असून त्याबद्दल अधिक माहिती जाहीर नाही.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पहिल्या दोघांच्या अटकेनंतर जेव्हा त्यांच्या पूर्वेतिहासाबद्दल समजलं, त्यानंतर हा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे गेला. ATS नं हे दोघे रहात होते ते कोंढवा इथलं घर, त्यांच्या संपर्कातले इतर लोक या सा-यांचा तपास सुरु झाला.
ATS नं पुढच्या काही दिवसात अजून काही व्यक्तींना अटक केली. गोंदियाच्या कादिर दस्तगीर पठाण, रत्नागिरीच्या सीमाब काझी यांना अटक केली. खान आणि साकी यांना पुण्यात मदत केल्याचा आरोप त्यांचावर आहे.
पुढे अगोदरपासून NIA च्या अटकेत असलेल्या झुल्फिकार अली बरोडावाला यालाही या पुण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. ATS च्या म्हणण्यानुसार बरोडावाला याच्या सांगण्यानुसार पठाण आणि काझी यांनी मदत केली होती.
ATS च्या तपासानुसार खान आणि साकी यांनी पुण्यात आल्यावर खोट्या ओळखीनं 'ग्राफिक डिझायनर' आहे असं सांगून वास्तव्य केलं. त्यांच्या खोट्या नावाची आधार कार्ड आणि इतर कागदपत्रंही घरी केलेल्या छाप्यात मिळाली आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'नं याबाबत तेव्हा बातमी दिली होती.
जंगलात रेकी आणि ट्रेनिंग कॅम्प
पण असं असलं तरी प्रत्यक्षात त्यांच्या कारवाया वेगळ्याच सुरु होत्या असं ATS नं म्हटलं आहे. इम्रान खान आणि युनूस साकी यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं मिळाली आहेत आणि त्यावरुन त्यांच्या कारवायांवर प्रकाश पडतो असं ATS नं आरोपींची कोठडी मागतांना कोर्टातही सांगितलं होतं.
5 ऑगस्टच्या प्रसिद्धीपत्रकात ATS नं म्हटलं आहे की, "आरोपींकडे मिळालेल्या साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून त्यांचं ISIS शी असलेलं कनेक्शन स्पष्ट झालं आहे.
खान आणि साकी लपण्यासाठी जंगलामध्ये वास्तव्य केलं होतं. तिथली ड्रोनद्वारे रेकीही केली होती. बरोडावाला याच्या सांगण्यानुसार काही साथीदारांसाठी या दोघांनी जंगलात बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग वर्कशॉप्सही घेतले होते."
ATS चा दावा आहे की या ट्रेनिंगच्या वेळेस वापरले गेलेली रसायनं, उपकरणं, राहण्याचे तंबू ही सगळी सामग्री त्यांनी आरोपींकडून जप्त केली आहे. शिवाय त्यांनी वापरलेली चारचाकी, दोन बंदुका आणि 5 जिवंत काडतुसंही त्यांनी हस्तगत केली आहेत.
NIAचा तपास आणि पुण्याचा डॉक्टर
पुणे पोलिसांचा तपास आणि मग ATS चा तपास पुण्यातल्या धागेदोऱ्यांभोवती फिरत असतांना इकडे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA यांचाही महाराष्ट्रकेंद्रित तपास अगोदरच सुरु झाला होता.
तो तपास ISIS चं कनेक्शन असलेल्या महाराष्ट्र मोड्यूलचा होता आणि त्याचे धागे यापूर्वीच पुण्याशी येऊन जुळले होते. पुण्यातून त्यांनी एका इंजिनिअरला अटकही केली होती.
हे सगळं घडलं पुणे पोलिसांनी बाईकचोर म्हणून दोघांना पकडण्याआधी. NIA नं मिळालेल्या काही माहितीनुसार 28 जून रोजी पुणे, मुंबई आणि ठाणे इथं 5 विविध ठिकाणी छापे टाकून चार जणांना अटक केली होती. यात एकाला पुण्यातनं, एकाला मुंबईतून आणि दोघांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं.
यामध्ये नागपाड्यातून तबीश नासीर सिद्धिकी पुण्याच्या कोंढव्यातून झुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातून शर्जिल शेख आणि झुल्फिकार अली बरोडावाला यांना अटक करण्यात आली.
NIA नं या कारवाईनंतर 3 जुलैला दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात असं म्हटलं की, "या आरोपींसंबंधीत ठिकाणी केलेल्या छाप्यांमध्ये बरेच आपत्तीजनक साहित्य, उपकरणं आणि कागदपत्रं मिळाली आहेत जी त्यांचा ISIS संबंधित आहेत. त्यावरुन त्यांचा ISIS शी संबंध आहे आणि इथल्या तरुणांना सोबत घेऊन या संघटनेचा भारतविरोधी कारवाया करण्याचा अजेंडा राबवण्याचा कट होता, हे दिसतं."
NIA च्या या कारवाईनंतर काही दिवसांनी पुणे पोलिस आणि ATS चा तपास दुसऱ्या प्रकरणात सुरु झाला आणि नंतर तो एका टप्प्यावर समांतर न राहता एकच झाला. पण त्याअगोदर NIA नं पुण्यात अजून एक मोठी कारवाई केली ज्याची मोठी चर्चा झाली. त्यांनी पुण्यातून एका प्रसिद्ध डॉक्टरला या मोड्यूलशी संबंध आहे या आरोपाखाली पकडलं.
27 जुलैला NIA नं पुण्याच्या कोंढव्यातून डॉ. अदनान सरकार यांना अटक केली. सरकार हे पुण्याच्या मोठ्या रुग्णालयाशी संबंधित आहेत. पण तपास यंत्रणेनं त्यांना ISIS शी संबंध असल्यावरुन आणि त्या संघटनेचा अजेंडा इथल्या तरुणांपर्यंत नेऊन त्यांना या कारवायांमध्ये ओढण्याच्या आरोपावरुन अटक केली. NIA चा दावा आहे की डॉ सरकार यांच्याकडून असं काही साहित्य मिळालं आहे जे त्यांच्या संबंध स्पष्ट करतं.
त्यानंतर 5 ऑगस्टला NIA नं या प्रकरणातली अटक केली. बोरीवलीच्या आकीफ नाचन याला पकडण्यात आलं. NIAच्या दाव्यानुसार आकीफ हा पुण्यातून ATS नं अटक केलेल्या आरोपींसोबत संपर्कात होता आणि त्यांच्या कारवायांमध्ये सहभागीही होता.
NIA च्या प्रसिद्धिपत्रकानुसार, "आतिक हा IED साठी लागणारं साहित्य गोळा करण्यापासून IED तयार करण्यापर्यंत पटाईत होता. त्यानं इम्रान खान आणि युनूस साकी यांना पुण्यात रहायला जागा मिळावी यासाठीही प्रयत्न केले. 2022 मध्ये जंगलात त्यांनी घेतलेल्या वर्कशॉपमध्येही तो सहभागी झाला होता आणि त्या दरम्यान त्यानं एक मर्यादित स्वरुपाचा IED चा स्फोटही करुन दाखवला होता."
यानंतर शुक्रवारी ११ ऑगस्टला ठाण्याच्या पडघ्यातून शामील नाचन याला पकडण्यात आलं आहे. शामीलवरही आरोप ठेवण्यात आला आहे की तो पुण्यातल्या कोंढव्यातून इम्रान आणि साकी यांच्यासोबत काम करायचा आणि तोही IED ट्रेनिंगमध्ये सहभागी होता.
पुढे काय?
28 जून ते 5 ऑगस्ट या महिन्याभरापेक्षा थोड्या जास्त काळात तपास यंत्रणांनी या कथित 'महाराष्ट्र ISIS मॉड्यूल'मधल्या 10 आरोपींना अटक केली आहे आणि देशविघातक कारवायांचा मोठा कट उधळल्याचा दावा केला आहे.
सुरुवातीला सुरु असलेले दोन स्वतंत्र तपास, पण नंतर नाचन आणि बरोडावाला यांच्या चौकशीनंतर त्यांचा एकत्र संबंध आहे, हेही समोर आलं. त्यानंतर NIA नं पुणे न्यायालयात हा संपूर्ण तपास आमच्याकडे सोपवावा असा अर्ज केला होता. त्यानुसार आता महाराष्ट्र ATS करत असलेला तपासही NIA कडे सोपवण्यात आला आहे.
जरी एवढे जण पकडले गेले असले आणि त्यांच्यावर अनेक आरोप ठेवून धक्कादायक खुलासे केले असले तरीही अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
ते ISIS या संघटेशी जोडलेले आहेत असा आरोप केला असला तरीही त्यांना नेमका कट काय होता? त्यांचं टारगेट काय होतं? ट्रेनिंग, रिक्रुटमेंट केली तरी त्यांना करायचं काय होतं? या गोष्टी सध्या तपासाधीन आहेत आणि त्यांबद्दल तपास यंत्रणांनी जाहीर काहीही सांगितलं नाही आहे .