मिरची विकून ‘या’ शेतकऱ्यानं 3 महिन्यांत 55 लाख रुपये कसे कमावले?

शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (22:12 IST)
“आम्ही मागच्या महिन्यात हिशेब केला होता, तर माझं 55 लाख 20 हजार रुपये उत्पन्न झालं होतं. त्यासाठी 10 ते साडे दहा लाख रुपये खर्च आला होता.”शेतकरी इक्बालखाँ पठाण मिरचीच्या शेतात बसून सांगत होते.
इक्बालखाँ जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावात राहतात.
 
ते मागील 16 वर्षांपासून मिरची लागवड करत आहेत. यंदा मात्र त्यांनी मिरचीच्या क्षेत्रात वाढ केली. तीही रिस्क घेऊन.
 
इक्बालखाँ सांगतात, “गेल्यावर्षी माझी 4 ते 5 एकरावर लागवड होती. लोकांना नुकसान झालं होतं. पण मला मात्र चांगलं उत्पन्न मिळालं होतं. याशिवाय यावर्षी अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे लोक मिरची लावणार नाही असं वाटलं.
 
"त्यामुळे आपल्याला चांगला भाव भेटू शकतो, असं जाणवलं आणि मी रिस्क घेऊन यावर्षी 11 एकर मिरची लावली.”
 
इक्बालखाँ यांनी एप्रिल महिन्यात पिकाडोर, शिमला, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. 25 मे पासून त्यांनी तोडणी सुरू केली.
 
ते सांगतात, “सुरुवातीला मला पिकाडोरला 65 रुपये, बलरामला 71 रुपये, शिमला मिरचीला 40 ते 45 रुपये दर भेटला. या व्हरायट्यांना मला चांगला भाव मिळाला.”
 
मिरचीतून दरवर्षीच फायदा होतो का?
इक्बालखाँ यांच्या शेतात आजपर्यंत मिरचीचे 8 तोडे पूर्ण झालेत आणि त्यांना 55 लाख रुपये उत्पन्न मिळालंय. आणखी उत्पन्न मिळण्याची त्यांना आशा आहे.
 
ते सांगतात, “अजून माझी तेजाफोर व्हरायटी शिल्लक आहे. ही मार्चपर्यंत चालते. याची लाल मिरची निघते. हिला चांगला 200 रुपयांपर्यंत भाव मिळतो. त्यामुळे मला अजून 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न होईल अशी आशा आहे.”
 
पण मिरची उत्पादनातून दरवर्षीच फायदा होतो का? असा प्रश्न विचारल्यावर इक्बालखाँ म्हणतात, “मिरचीत फायदा दरवर्षीच नाही राहत. कधीकधी फुटक भावात नेणं पडती, विकणं पडती, तोड्याचे पैसे निघत नाही, खर्च निघत नाही. पण चिकाटी म्हणून आम्ही लावतो. त्यामुळे दोन-तीन वर्षात एखादं वर्षं चांगलं येतं शेतकऱ्याला.”
इक्बालखाँ यांच्याप्रमाणे धावडा गावातील शेतकऱ्यांची मिरची राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेशचे व्यापारी गावात येऊन खरेदी करतात.
 
दुपारी 3 नंतर गावात गाड्यांची मोठी रेलचेल दिसू लागते. या गावातील सोमनाथ घोडके गेल्या 10 वर्षांपासून मिरचीचा व्यवसाय करत आहेत.
 
ते सांगतात,“माझ्याकडे दररोज दीड ते दोन टन माल येतो. आवक येते आणि जाते पण. माझ्या दुकानाची दररोजची उलाढाल की 12 ते 15 लाख रुपये आहे. गावाचा विचार केला तर या गावात 8 ते 10 दुकानदार आहेत.”
 
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे मिरचीचं मोठं मार्केट आहे. आम्ही या मार्केटला पोहोचलो, तेव्हा तिथं 250 ते 300 गाड्या दिसल्या. शेतकरी इथं मिरची घेऊन येतात आणि व्यापाऱ्यांना विकतात.
 
इथून ती मिरची देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, दिल्ली, निर्यात करतात. इथली मिरची बांगलादेश, दुबई आणि श्रीलंकेत निर्यात केली जाते, असं इथले स्थानिक व्यापारी सांगतात.
 
गेल्या काही वर्षांपासून भोकरदन हे मिरचीचं मोठं हब बनलंय. तुम्हाला सगळीकडे मिरचीची हिरवीगार शेतं दिसतात. पण, इथले शेतकरी मिरची पिकाकडे का वळालेत?
 
भोकरदनचे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते सांगतात, “मिरचीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान आलंय यात बेडवरती लागवड, मल्चिंगचा वापर आणि सूक्ष्म सिंचनाचा म्हणजे ठिबकचा वापर या तिन्ही तंत्रज्ञानामुळे आणि लोकलीच मार्केट उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या बाहेरच्या मार्केटमध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता राहत नाही. यामुळे इथले शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरची लागवडीकडे वळाले आहेत.”
भुते पुढे सांगतात, “भोकरदन तालुक्याचा जर विचार केला तर साधारणपणे 5 हजार हेक्टरवरती मिरचीची लागवड आहे. यातून दीड लाख टन उत्पादन मिरचीचं होतंय. यासाठी सरासरी 25 ते 30 रुपये किलो जरी भाव धरला, तरी साधारणपणे 350 ते 400 कोटी रुपयांची उलाढाल शेतकऱ्याच्या खिशात डायरेक्ट येऊ लागलीय. तीहीसगळे खर्च वजा जाता.”
 
मार्केटचा अंदाज घेणं गरजेचं
मार्केटचा अंदाज घेऊन मिरचीची लागवड केली तर नक्कीच फायदा होतो, असा इक्बालखाँ यांचा अनुभव आहे.
 
ते सांगतात, “लोकांच्या वाऱ्यावर चाललं नाही पाहिजे. आपला स्वत:चा आपण थोडा विचार केला पाहिजे की, मार्केटची हालात काय आहे. पुढे कोणतं पीक लोक कमी पेरू शकतात, कोणतं पीक जास्त पेरू शकतात, त्यानुसार मार्केटची आयडिया घेऊन लागवड केली तर बरोबर फायदा मिळत राहतो.”

दरम्यान, अतिपावसाचा फटका आणि कमी लागवड यामुळे मिरचीला सुरुवातीच्या काळात चांगला दर मिळालाय आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झालाय. तिखट मिरचीनं भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा आणलाय.
 





Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती