मेधा'ताई' विरुद्ध चंद्रकांत'दादा': 'भाजपात माझ्यासारख्या निष्ठावंतांची किंमत राहिली नाही'
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (23:23 IST)
मेधा कुलकर्णी
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरून महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर असणारी नाराजी व्यक्त केली आहे.
2019 साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेंव्हापासूनच या मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना डावललं जात असल्याच्या चर्चा होत होत्या.
आता या मतदारसंघात असणाऱ्या चांदणी चौकाच्या नूतनीकरणावरून चंद्रकांत पाटील विरुद्ध मेधा कुलकर्णी असा सामना रंगलेला पहायला मिळतोय.
मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर 'असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे' या मथळ्याखाली पोस्ट लिहून पहिल्यांदाच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये मेधा कुलकर्णी यांनी लिहिलं आहे की, "चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला".
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?"
मेधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे की त्यांना अनेक वर्षांपासून अनेक कार्यक्रमांमधून डावलण्यात येत आहे आणि संबंधित प्रकारची त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही दाखल केली होती मात्र त्यांना डावलणे सुरूच राहिले. पक्षात आता माझ्यासारख्या निष्ठावंतांची किंमत राहिली नाही असं वाटत असल्याचं मेधा कुलकर्णी त्यांच्या पोस्टमधून म्हणाल्या आहेत.
चंद्रकांत पाटील आणि मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता ते कामाच्या व्यग्रतेमुळे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर या बातमीत घेतली जाईल.
'चंद्रकांतदादांना हा घरचा आहेर'
मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले की, "चांदणी चौकातील पुलाबाबत मेधा कुलकर्णी यांनी आमदार असताना प्रयत्न केले होते हे खरंच आहे.
कोथरूडचे सध्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वर्तमानपत्रांमधून वाटलेल्या पत्रकांमध्ये मेधा कुलकर्णी यांचा उल्लेख केलेला नसल्यामुळे त्यांची नाराजी समोर येणं स्वाभाविक असलं तरीही या नाराजीची सुरुवात 2019 विधानसभा निवडणुकीपासूनच झाली होती.
मेधा कुलकर्णी यांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबतही वाद होतेच. मुरलीधर मोहोळ, संजय काकडे यांच्याशी असणारे त्यांचे वाद यापूर्वी देखील समोर आले होते. त्यामुळे आता मेधा कुलकर्णी यांची नाराजी समोर आलेली दिसते.
कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांची वैयक्तिक ताकद असल्याचंही मेहता म्हणाले.
"मेधा कुलकर्णी यांनी बंडखोरी केल्यास त्याचा भाजपला नक्कीच फटका बसू शकतो मात्र त्या तसे करण्याची शक्यता कमी आहे.
देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि दस्तरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना न्याय देण्यासाठी भाजपकडून मेधा कुलकर्णी यांना विधानसभा, चंद्रकांत पाटील यांना विधानपरिषद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वी करणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदरवारी देऊन यातून मार्ग काढला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही."
आधी कसबा आणि नंतर कोथरूड?
याचवर्षीच्या मार्च महिन्यात कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले होते.
मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना त्यांच्या समर्थकांनी आता 'कोथरूडचाही कसबा करू' अशा कमेंट्स केल्या आहेत.
मेधा कुलकर्णी यांना अंतर्गत हेवेदावे बाजूस सारून एकदिलाने कार्य करावे असा सल्ला देणाऱ्या कार्यकर्त्याला उत्तर देताना मेधा कुलकर्णी यांनी लिहिलं की, "एकदिलाने काम करण्याचाच प्रयत्न केला. जे जबाबदार आहेत त्यांना कृपया सांगावे."
विधानपरिषदेचं तिकीटही डावललं तेव्हा...
गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी नाकारून ती चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली होती. त्यावेळी आपल्याला विधानपरिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं, असं मेधा कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मात्र, हे आश्वासनही पूर्ण करण्यात आलं नाही. पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळेस मेधा कुलकर्णी यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला होता.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "मला विधान परिषदेचं आश्वासन दिलं होतं. आत्ताचे कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष (चंद्रकांत पाटील) यांच्यासाठी मी ही जागा मोकळी केली. तसं म्हणण्यापेक्षा पक्षाचा आदेशच असतो तो. ते करणं माझं कर्तव्यच असतं. त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं जाईल. माझी सक्रियता, पक्षावरची निष्ठा आणि त्याचा पक्षाला होणारा उपयोग याचा पक्ष नक्कीच विचार करेल, याची मला खात्री वाटते."
"मी पक्षावर नाराज अ्सण्याचं कारण नाही. केंद्रातलं सरकार उत्तम काम करतंय. गेल्या 60-70 वर्षांत जे निर्णय होऊ शकले नाही ते आता झालेत. काश्मीरच्या निर्णयापासून अनेक चांगले निर्णय झालेत. त्यामुळे पक्षावर नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. मी आयुष्य ओवाळून टाकेन या पक्षावर."
"दोघांच्या कार्यशैलीविषयी माझी नाराजी किंवा काही म्हणणं असू शकतं. तर ते पक्षीय पातळीवर मी नक्कीच मांडेन आणि स्वतःच्या नाही तर पक्षाच्या हितासाठी नक्की मांडेन. जुने जाणते लोक हे समजून घेतील की काही गोष्टी किंवा कार्यशैली बदलली पाहिजे की जेणेकरून पक्षाला नुकसान न होता फायदा होईल. मी पक्षात आहे. मी अजून हा शब्द वापरलेला नाही. कारण मी कायमच पक्षात आहे."
मेधा कुलकर्णी इतर पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःच फेसबुकवर पोस्ट टाकत आपण कुणाच्याही संपर्कात नसल्याचं स्पष्ट केलं.
याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "मी कुठल्यातरी पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे किंवा ते मला तिकीट देण्यासाठी इच्छुक आहे, अशा माझ्यासंदर्भातल्या बातम्या मुद्दाम प्रसारित केल्या जातात. पण हा खोडसाळपणा थांबवला पाहिजे. यावर मी तीव्र नाराजी व्यक्त करते. मी कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी कुठल्याही पक्षाकडून तिकीट मागितलेलं नाही. भाजपकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आत्ताच घोषित झाले त्यांचं काम मी मनापासून करणार आहे."
त्या म्हणाल्या होत्या, "कुठल्याही कार्यकर्तीला पदापेक्षा काम हवं असतं. मी गेली अनेक वर्ष भाजपसाठी झोकून देऊन काम केलं आहे आणि तो माझा पिंड आहे. तेव्हा एखाद्या सक्रीय व्यक्तीला कामाविना ठेवणं, यातून जी जाणीव होते, त्याविषयीच्या या भावना आहेत. मला खूप तळमळ आहे. समाजासाठी काहीतरी करायचं आहे. ते करण्यासाठी म्हणून काहीतरी जबाबदारी असावी. अगदी मला चीनच्या बॉर्डरवरही पाठवलं तरी मला चालणार आहे."