HSC Results 2020 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. जरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.
राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.
कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होता. मात्र, विद्यार्थी व पालकांची निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली होती. अखेर सर्व अडचणींवर मात करून गुरुवारी राज्य मंडळाने निकाल जाहीर केला.
वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
त्याचबरोबर www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.