फक्त मंदिरं खुली केल्यानेच कोरोना वाढतो, का असा सवाल करत भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनाचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स मॉल सुरु झाली, मात्र मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना का रोखले जाते. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्दी परिसरातील विविध स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद करत भाजपने मंदिरं उघडण्याची मागणी केली.
नाशकात रामकुंड परिसारत निदर्शनं
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही ही निदर्शनं झाली. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी साधू महंत आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी महापौरांचीही उपस्थिती होती. सरकारला टल्ली झालेले लोक चालतात, मग देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले लोक चालत नाही, असा सवाल नाशिकमधील साधू-महंतांनी केला.