राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. पण कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच माहीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दौऱ्याची माहिती ८ ते १० दिवस आधीच देण्यात आली होती, तरीही बऱ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीचा थांगपत्ता नव्हता. अनेकांना या बैठकीची माहिती आज सकाळी कळाली. यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे या बैठकीला गैरहजर राहिले.
या घटनाक्रमानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे, याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, “एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये अनास्था दिसत आहे. या हॉलमध्ये आज राज ठाकरेंची सभा आहे, हे कार्यकर्त्यांना आज कळालं आहे. विशेष म्हणजे हा दौरा पूर्वनियोजित असून ८ ते १० दिवस आधीच दौऱ्याची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली होती. तरीही कार्यकर्त्यांना याबाबत गांभीर्य नसेल तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असणारी उर्मी आम्हाला दिसून येते,” अशी प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली.