दिल्लीत अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायली दूतावासाच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाला. या घटनेनंतर संपूर्ण स्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लक्ष ठेवून आहेत. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतची माहिती अजित पवार यांनी स्वतः ट्विट करत दिली. तसेच महाराष्ट्राच्या जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहनही अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केले आहे.
दिल्लीतील इस्रायली दूतावासाच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर स्फोट झाल्याचे कळल्यावर महाराष्ट्र सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने केलेल्या सूचनेनुसार मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.
शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानेही (सीआयएसएफ) सर्व विमानतळे, महत्वाची आस्थापने आणि शासकीय इमारतींसाठी अलर्ट जारी केला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.