सतत मोबाईल वापरल्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (18:02 IST)
दीपाली जगताप
बीबीसी मराठी
"माझा मुलगा रात्रभर मोबाईल पाहतो. यामुळे सकाळी शाळेसाठीही उठत नाही. ऑनलाईन शाळेला हजर राहता येत नाही."
"मोबाईल दिला नाही की माझी मुलं प्रचंड चिडतात. मोबाईल देण्यासाठी घरातल्या वस्तू फेकतात."
"एकाच घरात राहूनही माझ्या मुलीला आमच्याशी बोलायला वेळ नाही. सतत मोबाईलवर असल्याने घरातल्या माणसांशीही काहीच संवाद नाही."
"ड्रगची नशा असते तशी मोबाईलची सवय होत आहे."
मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञांकडे पालकांनी केलेल्या या तक्रारी. लॉकडॉऊन काळात मुलांचा स्क्रीनटाईम वाढला आणि मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट्स आणि इतर गॅझेट्सची सवय लागली.
आता ही सवय कमी करत असताना पालकांना मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे आढळून येत आहे.
शाळा, महाविद्यालय बंद असल्यानं मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. बाहेरचे खेळ बंद झाल्यानं अगदी लहान मुलंही तासनतास मोबाईलवर खेळू लागले. कार्टून्स, गेम्स, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशा मनोरंजनाच्या नवीन साधनांची मुलांना सवय लागली.
स्क्रीनटाईम वाढल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला आहे? तुमच्या मुलांनाही मोबाईलची सवय लागली आहे का? त्यांच्याशी संवाद कमी झालाय का? मुलांमध्ये एकटेपणा वाढला आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
मुलांच्या मानसिक आरोग्यवर काय परिणाम झाला आहे?
"माझ्याकडे अनेक पालकांच्या तक्रारी येत आहेत. घरात एकत्र राहत असूनही मुलांकडे आमच्यासाठी वेळ नाही. लहान मुलं असो वा मोठी, एकतर ती मोबाईल फोनवर असतात किंवा ऑनलाईन गेम आणि लॅपटॉपमध्ये व्यग्र असतात. मुलांसोबत आमचा संवाद कमी झाला आहे," बीबीसी मराठीशी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी ही माहिती दिली.
एवढेच नाही तर ते पुढे सांगतात, "एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की मुलं प्रचंड चिडचिड करतात, लहान मुलांना तर जेवणासाठीही मोबाईल हातात द्यावा लागतो, भेटीगाठी कमी झाल्याने मुलांमध्ये एकटेपणा वाढला आहे. अस्वस्थता, भीती, डिप्रेशन वाढले आहे."
आधी मुलांना काही वेळासाठीच मोबाईल हातात मिळत होता. शाळा, महाविद्यालय, क्लासेस, मैदानातील खेळ यात मुलांचा वेळ जात होता. पण घरी बसून मुलं मोबाईल स्क्रीनच्या अत्यंत जवळ गेले आहेत. पण यामुळे प्रत्यक्ष माणसांशी ते दूर होत असल्याचे चित्र आहे.
मानसोपचारतज्ज्ञ सांगतात, "तरुण मुलांमध्येही आत्मसंयमाचा अभाव, जिज्ञासेचा अभाव दिसून येतो. भावनात्मकदृष्ट्या मुलं अस्थिर होत आहेत. हायपरॲक्टिव्ह डिसॉर्डर, डिप्रेशन आणि सोशल अँग्झायटी असलेली मुलं स्क्रीनकडे अधिक आकर्षित होतात."
मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दहा ते वीस वर्षांच्या मुलांना रात्रभर मोबाईल पाहायची सवय लागली आहे. मुलांचा कुटुंबीयांशीही संवाद कमी झाला आहे. मोबाईल दिला नाही तर मुलं आक्रमक होतात, असंही पालक सांगतात."
तरुण मुलांमध्ये याचे आणखी वेगळे परिणाम दिसून येत आहेत. सोशल मीडियाची प्रचंड सवय असणं, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सतत वेळ घालवणं, अनोळखी मुला-मुलींशी ऑनलाईन मैत्री होणं असे काही अनुभव पालकांना येत आहेत.
यासंदर्भात बोलताना डॉ.राजेंद्र बर्वे सांगतात, "मुलं लोकांपासून दूर होत आहेत. गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत की मुलं ऑनलाईन एंटरटेनमेंटकडे वळतात. संवाद कसा साधायचा हेच मुलांना कळत नाही. सोशल स्किल्स डेव्हलप होत नाही. आपण अनुभवातून शिकलो तो अनुभव या मुलांना मिळत नाही. यामुळे एकटेपणा वाढतो. त्याच्याही पलिकडे जाऊन आयुष्याला सामोरं जाण्याची क्षमता कमी होत आहे."
उपचाराची गरज आहे हे कसे ओळखायचे?
डॉ. सागर मुंदडा सांगतात, "मुलांना मोबाईल ऐवजी पर्यायी साधन देऊन पाहा. त्याचा वेळ, ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होईल असे पर्याय उपलब्ध करा. पण तरीही मोबाईलशिवाय मुलं राहत नसतील, रात्रभर झोप येत नसेल, आक्रमक होत असतील तर मुलांना उपचाराची गरज आहे."
मानसोपचार म्हणजे औषध उपचार असे नाही. तर केवळ काऊंसिंलींग/ समूपदेशनाने मुलांना समजावणे शक्य होते.
डॉ. मुंदडा सांगतात, "सुरुवातीला आठवड्यातून एक किंवा दोन दिवस घरातील सर्वांनी मोबाईल फ्री डे पाळायला हवा. दिवसभरात कोणीही मोबाईल पाहणार नाही असे ठरवून करायला हवे. यामुळे सवयीवर नियंत्रण ठेवण्यास मुलांना मदत होईल.
"दिवसभरातही काही विशिष्ट वेळी मोबाईल पाहता येणार नाही असा नियम करा. यामुळे मुलांना संयम राखण्यास मदत होईल. सुरुवातीपासूनच असे नियम केले तर मुलांच्या सवयी नियंत्रणाबाहेर जाणार नाहीत. त्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होणार नाही."
मुलांची सवय टोकाला जाईपर्यंत पालकांनी प्रतीक्षा करू नये. पालकांनी सुरुवातीपासून याची काळजी घेणे गरजेचे आहे, असं डॉक्टर सांगतात.
स्क्रीनटाईमवर मर्यादा कशा आणायच्या?
तुमचं मूल 24 तासांमध्ये किती काळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेटसारख्या गॅजेट्सचा वापर करतात याला स्क्रीनटाईम म्हणतात.
लॉकडॉऊनमध्ये मुलांचा स्क्रीनटाईम अर्थात वाढला आणि आता मुलांना त्याची सवय झाली आहे. ही सवय बदलण्यासाठीही पालकांना प्रचंड मेहन घ्यावी लागतेय.
चीडचीड, मानसिक समस्या आणि डोळ्यांचा ताण या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता केंद्रीय शिक्षण विभागाने डिजिटल शिक्षणासाठी स्क्रीनटाईम निश्चित करणाऱ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पूर्वप्राथमिक ( प्लेग्रुप ते सी.केजी) विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गाची मर्यादा 30 मिनिटांपेक्षा जास्त नसावी.
इयत्ता पहिली ते आठवीसाठी दोन ऑनलाईन सत्रे होणार आहेत. सत्रामध्ये 45 मिनिटांचा वर्ग असेल.
'अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स'ने लहान मुलांच्या स्क्रीनटाईम संबंधी काही मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत.
18 महिन्यांपेक्षा लहान मुलांना गॅजेट्सचा वापर करू देऊ नका, अशी सूचना केली आहे.
18 ते 24 महिन्याच्या काळात आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना उच्च गुणवत्ता असलेलेच कार्यक्रम दाखवावेत.
2 ते 5 वर्षांच्या मुलांना एका तासापेक्षा जास्तवेळ हे गॅजेट्स वापरू देऊ नयेत.
सहा वर्षं आणि त्याहून अधिक वय असलेल्या मुलांचा स्क्रीन वापराबाबत वेळ निश्चित असावा. त्याचबरोबर त्यांना झोपण्यासाठी, खेळण्यासाठी पुरेसा वेळ असावा.
विविध आस्थापनांकडून मुलांचा स्क्रीनटाईम वाढल्याने काळजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, स्क्रीनटाईम किती असावा यासाठी मर्यादित वेळेचे नियोजन देण्यात आले आहे.
पण प्रत्यक्षात शाळा, ट्यूशन, गृहपाठ आणि मनोरंजन अशा सर्वच गोष्टी ऑनलाईन सुरू असल्याने स्क्रीनटाईमवर मर्यादा कशा आणायच्या असा प्रश्न पालकांच्या मनात आहे.
यासंदर्भात मार्गदर्शन करताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे असं सांगतात,
1. स्क्रीनटाईम मर्यादित ठेवायचा.
2. खेळणी केवळ आणून देऊ नका. पालकांनी मुलांसोबत खेळावं.
3. एकमेकांशी संवाद साधता येतील असे खेळ खेळा. एकापेक्षा अधिक लोकांचा सहभाग असेल अशा खेळांची मुलांना गोडी लावा.
4. मुलांमध्ये कुतुहल जागरुक करणाऱ्या अनेक विषयांच्या माहितीच्या साईट्स आणि व्हिडिओ आहेत. मुलांना याची सवय लावा.