शेतकऱ्यांनो, एक इंचही मागे हटू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत - राहुल गांधी

शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (17:29 IST)
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान आज (29 जानेवारी) सिंघू आणि टिकरी अशा दोन सीमांवर हिंसक झटापट झाली. आंदोलक शेतकरी आणि कथित स्थानिक लोक यांच्यात ही झटापट झाल्याचं सांगितलं जात आहे.
 
या हिंसाचारादरम्यान काही पोलिसही जखमी झाले आहेत. तसंच, टिकरी आणि सिंघू या दोन्ही सीमांवर सध्या तणावाची स्थिती आहे.
 
तिन्ही कृषी कायदे मागे घेणं हा एकच उपाय आहे - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, "पहिला कायदा, बाजार समित्या उद्ध्वस्त करतो. दुसरा कायदा, साठेबाजीला प्रोत्साहन देतो. तिसरा कायदा, शेतकऱ्यांना कोर्टात जाऊ देत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कृषी क्षेत्र उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत."
 
"शेतकऱ्यांबाबत जे होतंय, ते गुन्हेगारी स्वरूपाचं आहे. तुम्ही त्यांना मारहाण करताय. शेतकऱ्यांसमोर उपाय ठेवणं गरजेचं आहे. एकच उपाय आहे, तो म्हणजे कायदे मागे घेण्याची आवश्यकता आहे," असंही राहुल गांधी म्हणाले.
 
"शेतकऱ्यांना लाल किल्ल्याच्या परिसरात का जाऊ दिलं? गृहमंत्रालयाचं हे काम नाहीय का, त्यांना तिथं रोखण्याचं? गृहमंत्र्यांना हे विचारलं पाहिजे," असं म्हणत राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
 
शेतकऱ्यांनी एक इंचही मागे हटू नये, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आवाहन यावेळी राहुल गांधी यांनी केलं.
 
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
कोरोनादरम्यान गरीब लोक अधिक गरीब झालेत, श्रीमंत लोक अधिक श्रीमंत झाले
पंतप्रधान केवळ पाच लोकांसाठी काम करतायेत, त्यांच्यासाठीच नोटबंदी केली
शेतकऱ्यांना सांगतो, सर्वजण आम्ही तुमच्यासोबत आहे. एक इंचही मागे हटू नका. शेतकऱ्यांचं भविष्य चोरी होऊ देणार नाही.
माझा 15 वर्षांचा राजकीय अनुभव आहे की, हे आंदोलन थांबणार नाही, ते अधिक जोराने पसरेल
दोन-चार चुकीच्या लोकांवर कारवाई करा, पण प्रामाणिकपणे आंदोलन करणाऱ्या लाखो लोकांना हात लावू नका
भाजप दोन वर्षांपासून कायदे मागे घेण्यास तयार आहे, मग कायमचे मागे का घेत नाहीत?
टिकरी आणि सिंघू सीमेवर तणावपूर्ण स्थिती
दिल्लीच्या टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आणि कथित स्थानिक लोकांमध्ये हिंसक झटापट झाली. यानंतर टिकरी सीमेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
 
टिकरी सीमेवरून वृत्तांकन करत असलेले बीबीसीचे प्रतिनिधी दलीप कुमार सिंह यांच्या माहितीनुसार, सिंघू सीमेसारखंच टिकरी सीमेवरही कथित स्थानिक लोक एकत्र झाले आणि 'तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान' अशा घोषणा दिल्या.
 
दलीप यांनी सांगितलं की, कथित स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, आंदोलकांमुळे त्यांचं कामकाज ठप्प झालंय आणि आता ते इथं आंदोलन सुरू ठेवू देणार नाहीत.
 
तर सिंघू सीमेवरून वृत्तांकन करत असलेले बीबीसीचे प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांच्या माहितीनुसार, सिंघू सीमेवरही तणावपूर्ण स्थिती कायम आहे. पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलाय. काही वेळापूर्वी झालेल्या हिंसाचारात काही पोलीस जखमी सुद्धा झालेत.
 
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर स्थानिक लोक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला आहे. स्थानिक आणि शेतकऱ्यांमध्ये भांडण झाले आहे.
 
सिंघू बॉर्डरवर हिंसाचार, आंदोलक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष
स्थानिक आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे.
 
याआधी, गुरुवारी (28 जानेवारी) प्रशासनाकडून गाझीपूर बॉर्डरवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. याबाबत किसान आंदोलनाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्याशी चर्चाही करण्यात आली. पण टिकैत यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून आंदोलनस्थळ रिकामे करणार नसल्याचं म्हटलं आहे.
 
टिकैत यांनी हे आंदोलन सुरूच राहील, असं म्हटल्यानंतर घरी परतलेले शेतकरी पुन्हा आंदोलनस्थळी परतण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचं टिकैत यांनी सांगितलं.
 
प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या हिंसाचारानंतर आता शेतकरी आंदोलनाचं काय होणार याबाबत दिल्लीसह देशात सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
 
दरम्यान, रॅलीमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता आंदोलनस्थळी नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. दिल्ली पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडलेल्या हिंसेबाबत गुन्हे दाखल करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
 
तीन शेती कायद्यांना विरोध दर्शवत पंजाब-हरयाणा परिसरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलनास बसले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथे ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती.
 
या रॅलीदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. काही आंदोलक शेतकरी थेट लाल किल्ल्यावर पोहोचल्यानं आंदोलक शेतकरी आणि पोलीस प्रशासन तसंच सरकार यांच्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.
 
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (27 जानेवारी) दिल्लीतील रस्त्यांवरची वाहतूक सुरळीत झाल्याचं पाहायला मिळालं. रॅलीसाठी दिल्लीत दाखल झालेले ट्रॅक्टर पुन्हा आपल्या आंदोलनस्थळी दिल्लीच्या सीमेवर परतले.
 
गाझीपूर सीमेवर तणाव
गुरुवारच्या दिवशी (28 जानेवारी) शेतकरी आंदोलनाचं एक ठिकाण असलेल्या गाझीपूर सीमेवर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
 
या ठिकाणचा वीजपुरवठा आदल्या दिवशीच्या मध्यरात्रीपासून खंडीत करण्यात आला होता. याठिकाणी पोलीस कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणात बोलावण्यात आला. सोबत अनेक बसही आणल्या गेल्या. पण तसं काही पाहायला मिळालं नाही. संध्याकाळनंतर पोलीस मागे परतले.
 
गाझीपूरप्रमाणेच टिकरी आणि सिंघू बॉर्डरवरही अशाच प्रकारच्या घडामोडी घडताना दिसून आल्या. याठिकाणचा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता. त्यामुळे आता पोलीस आंदोलकांवर कारवाई करणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
 
शेतकरी जमा होण्यास सुरुवात
गाझीपूर बॉर्डरवर आता शेतकरी येण्यास सुरुवात झाली आहे. अचानक याठिकाणची गर्दी वाढली आहे. मेरठ, बिजनौर, मुजफ्फरनगर, बुलंदशहर खुर्जा या परिसरातून लोक आंदोलनस्थळी येत आहेत.
 
काल रिकामा वाटत असलेला हा परिसर आता पुन्हा गजबजला आहे. याठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
 
राकेश टिकैत हे काल माध्यमांशी बोलताना भावनिक झाल्याचं दिसून आलं होतं. त्यांनी भावनिक आवाहन केल्यानंतर लोकांचा प्रतिसाद मिळणं सुरू झालं आहे. आता याठिकाणी आधीपेक्षाही जास्त गर्दी जमेल, या गर्दीवर नियंत्रण आणणं अवघड होईल, असं शेतकरी म्हणत आहेत.
 
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. कुणालाच अटक करू दिली जाणार नाही, शेतकरी आंदोलन सुरूच राहील असं टिकैत म्हणाले.
 
लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवलेल्या लोकांची सखोल चौकशी व्हावी. ते लोक शेतकरी असू शकत नाहीत, असा दावा टिकैत यांनी केला.
 
दरम्यान, राकेश टिकैत हे काल पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण टिकैत यांनी ही चर्चा अफवा असल्याचं सांगत शरणागती पत्करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचं म्हटलं.
 
शेतकरी नेत्यांना नोटीस
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी शेतकरी नेत्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठीचा करार मोडल्याच्या संदर्भात नोटीस बजावली. योगेंद्र यादव, बलदेव सिंह सिरसा, बलबीर एस राजेवाल यांच्यासह सुमारे 20 शेतकरी नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसचं उत्तर शेतकऱ्यांनी तीन दिवसांत द्यावं असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे.
 
2 संघटनांची आंदोलनातून माघार
भारतीय किसान यूनियन (भानू) आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने आंदोलनातून माघार घेत असल्याचं बुधवारी घोषित केलं होतं. त्यानुसार या संघटनेचे सदस्य या आंदोलनास्थळावरून निघून गेले.
 
ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसेनंतर आपल्याला प्रचंड दुःख आणि लज्जास्पद वाटत असल्याने आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं भारतीय किसान यूनियन (भानू) चे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी म्हटलं.

अमित शाह यांनी जखमी पोलिसांची भेट घेतली
प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या गोंधळादरम्यान जखमी झालेल्या पोलिसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी भेट घेतली. दिल्लीच्या सिव्हील लाईन्स परिसरातील सुश्रुत ट्रॉमा सेंटरमध्ये या पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या पोलिसांचं धाडस आणि शौर्यावर आपल्याला अभिमान असल्याचं गृहमंत्री यावेळी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती