माझ्या वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल,' शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

शनिवार, 8 जुलै 2023 (23:57 IST)
'माझं वय झालं म्हणून बोललं जातं. माझं वय 83 आहे, पण गडी काय आहे, तुम्ही अजून पाहिलाय कुठे, माझ्या वयाचा उल्लेख कराल, तर महागात पडेल', असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे.
 
5 जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत तुम्ही थांबणार आहात की नाही, असा सवाल केला होता.
 
ते नाशिकमधील येवला येथे आयोजित जाहीर सभेत पवारांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिलं. अजित पवारांच्या बंडानंतरची ही पहिलीच सभा आहे. विशेष म्हणजे, येवला हा कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं.
 
यावेळी शरद पवार म्हणाले, "अनेक संकटे आली, पण काही सहकाऱ्यांनी आमची साथ दिली. आज मी येवलाच्या नागरिकांची माफी मागायला आलो आहे. कारण नाशिकच्या जनतेने पुरोगामी विचारांना साथ दिली होती. माझा अंदाज सहसा चुकत नाही. पण येथे माझा अंदाज चुकला म्हणून मी तुमची माफी मागतो."
 
यापुढे, निवडणूक लागेल, तेव्हा मी पुन्हा येईन, पण पुढच्या वेळी माझ्याकडून चूक होणार नाही, याची काळजी घेईन, असं ते म्हणाले.
 
येवला मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे.
 
पवार म्हणाले, नुकतेच नरेंद्र मोदी यांचं एक भाषण झालं. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तुमच्याकडे सत्ता आहे. तुमच्याकडची सगळी यंत्रणा वापरून आमचा तपास करा. तुम्हाला काहीही सापडणार नाही."
 
येवल्याला का जात आहे, असं विचारण्यात आलं. पण मी कुणाबाबत वैयक्तिक बोलत नाही. माझ्या मनात केवळ एकच भावना आहे. अनेक क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्हा पुढे जात आहे. पण येवल्यातील काही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
 
माझं वय झालं म्हणून बोललं जातं. माझं वय 83 आहे, पण गडी काय आहे, तुम्ही अजून पाहिलाय कुठे, माझ्या वयाचा उल्लेख कराल, तर महागात पडेल, असं पवार म्हणाले.
 
माझ्या धोरणाबाबत टीका करा, कार्यक्रमाबाबत टीका करा, पण वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला कुणीही शिकवलेल्या नाहीत.
 
आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी वाढलो. त्यामध्ये व्यक्तिगत हल्ले कधी झाले नाहीत. आमची तक्रार एकच आहे. ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं, त्या जनतेच्या विश्वासाला तडा बसेल, असं पाऊल तुम्ही टाकलं तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांना त्याची किंमत आज ना उद्या द्यावी लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं.
 



Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती