गुलाब चक्रीवादळ : राज्यात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज

मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (08:50 IST)
गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आज (28 सप्टेंबर) मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
 
पुणे, अहमदनगर, सांगली, बीड जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (28 सप्टेंबर) वादळी वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
 
हे वादळ रविवारी (25 सप्टेंबर) मध्यरात्री आंध्रप्रदेशातल्या श्रीकाकुम जिल्ह्याच्या किनाऱ्यावर धडकलं आहे.
महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम जाणवतील याची माहिती हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली आहे.
 
"गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळाधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा जाणवेल. 27 सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाडा तर 28 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी," असं भुते यांनी सांगितलं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळ तयार झालं.
 
महाराष्ट्रात कुठे पाऊस पडण्याची शक्यता?
28 सप्टेंबरला मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्यास सांगितलं आहे. नंदूरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 27 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, तर नाशिक,पुणे,रत्नागिरी,रायगड,सातारा,नंदूरबार,परभणी,हिंगोली,लातूर,यवतमाळ,गडचिरोली या जिल्हयात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
 
29 सप्टेंबरला मात्र चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात कमी होताना दिसेल.पालघर,ठाणे,मुंबई,नाशिक,नंदूरबार, औरंगाबाद,जालना या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती