राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेणार

मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (08:35 IST)
27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे, येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावं, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
 
तसंच या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली. राज्याच्या पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा  करावी, राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेऊ अशी माहिती उदध्व ठाकरे यांनी दिली. पर्यटन विभागाकडे याआधी दुर्दैवाने कुणी लक्ष दिलं नव्हतं पण आता यापुढील काळात आपण महत्व देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका पर्यटन व्यवसायास बसला पण अशा परिस्थितीत देखील तुम्ही नवीन योजना, उपक्रम आणले, रोजगार दिला हे कौतुकास्पद आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 
 
देशातील 1200 लेण्यांपैकी महाराष्ट्रात 800 लेणी आहेत,आपल्या पूर्वजांनी अप्रतिम लेणी खोदली,शिल्पे निर्माण केली, आपल्याला खरोखरच किती लेणी ठाऊक आहेत?आपण म्हणतो की आपण खूप विकास केला पण त्या काळातल्या सारखे दगडातून रेखीव शिल्प आज आपण निर्माण करू शकतो का? आजच्या युगातली लेणी निर्माण करायला हवी,असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती