पावसाची जोरदार हजेरी, घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

बुधवार, 9 जून 2021 (09:53 IST)
मुंबई महानगर क्षेत्रात 10 ते 13 जून दरम्यान हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला अजून दोन दिवस लागतील, असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे.
 
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं, "9 जूनपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू होईल. 11 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाचा प्रभाव सर्वाधिक उत्तर कोकणात असेल. मुंबई, ठाणे, रायगड या भागात अतिवृष्टी होऊ शकते." त्यासाठी नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे."
 
नुकतंच तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान कोकणात बघायला मिळालं. त्यामुळे या अतिवृष्टीसाठी सरकारकडून पूर्वनियोजन करण्यात आले आहे. यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत काय ठरले?
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बैठक घेतली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यात आला.
 
या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांनी पुढे याबाबत प्रशासनाला आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सूचना दिल्या.
 
* रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेताना, धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
* अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात. ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे.
* या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना देण्यात यावी.
* किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी.
 
* जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा.
* मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. * धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
* अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजन चा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
* मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणाऱ्या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्सची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी.
* दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी.
* सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाबरोबर पावसाळी आजार पसरले तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
 
मुंबई महापालिकेची तयारी
पावसाळा सुरू झाला की, मुंबई पाण्याखाली जाते हे चित्र प्रत्येकवर्षी दिसतं. नुकतंच मुंबईत तिसऱ्या टप्यानुसार 'अनलॉक' झाल्यामुळे लोकं घराबाहेर पडू लागले आहेत. बसेसमध्ये 100% प्रवासाला परवानगी असली तरी लोकल ट्रेन सध्या सामान्यांसाठी बंद आहेत. त्यामुळे दरवर्षीसारखे या पावसामुळे लोकल ट्रेन ठप्प होऊन सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. पण बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या पावसाचा फटका बसू शकतो.
 
मुंबईत पाणी साचणार नाही किंवा साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेने काय तयारी केली आहे? मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याबाबत माहिती दिली.
 
ते म्हणाले, "या वर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी 774 पंप बसवण्यात आले आहेत. या पंपाद्वारे पाण्याचा निचरा होऊ शकेल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंते पाणी साचण्याच्या ठिकाणी उपस्थित राहून पाण्याचा योग्यप्रकारे निचरा करण्याचे काम करतील. मुंबईचा सखल भाग असलेला हिंदमाता परिसरात दोन मोठे टॅंक उभे करण्यात आले आहे. या टँकरद्वारे साचलेले पाणी वळते करून ते साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
प्रत्येक पोलीस स्टेशनला निधी देऊन 'स्कॉड' तयार करण्यात आले आहेत. हे 'स्कॉड' अतिवृष्टीमुळे झाडे पडली, त्यामुळे हायटाईडमध्ये अडथळे निर्माण झाले तर त्याच्या निवारणाचं काम करतील."
 
इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं, "वाहतूकीसाठी रस्ते मोकळे राहतील याची काळजी घेतील. काही नागरिकांचे स्थलांतर करण्याची गरज पडली तर त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात 5 महापालिकेच्या शाळा तयार ठेवल्या आहेत. लसीकरण केंद्र, रूग्णालये, लसीचे साठे असलेले शीतगृह याठिकाणी 'पॉवर बॅकअप' देण्यात आले आहेत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती