भारतात सांडपाण्यातही सापडला कोरोना व्हायरस

बुधवार, 9 जून 2021 (09:48 IST)
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळले आहेत. हैदराबाद इथल्या 'सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजी'नं (CCMB) हा दावा केला आहे.
 
व्हायरसचे सापडलेले नमुने संसर्गजन्य नसल्याचंही CCMBनं म्हटलं आहे.
 
एखाद्या भागातील सांडपाण्याचा नीट अभ्यास केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो की नाही याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असंही CCMBनं म्हटलं आहे.
 
बीबीसीनं CCMB चे निर्देशक राकेश मिश्रा यांच्याशी कोरोना व्हायरसचे वेगवेगळे प्रकार, कोरोनाची लस आणि कोरोनाच्या संसर्गाची क्षमता याविषयीच्या मुद्द्यावर चर्चा केली.
 
हे सर्वेक्षण कशासाठी?
CCMB नं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कोरोना व्हायरसचे नमुने हैदराबादमधील सांडपाण्यात आढळले आहेत. पण, CCMBनं हे सर्वेक्षण कशासाठी केलं?
 
राकेश मिश्रा सांगतात, "सिरोलॉजिकल टेस्ट, रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा दुसऱ्या एखाद्या कोरोना चाचणीनंतरच व्यक्तीला कोरोना झाला की नाही, याची माहिती मिळते. पण, यासाठी प्रत्येक व्यक्तीचं सॅम्पल घ्यावं लागतं. मात्र, सांडपाण्यातूनही तुम्हाला व्हायरस आढळून येऊ शकतो. आम्ही यासाठीच प्रयत्न करत आहोत. आम्हाला सांडपाण्यात कोरोनाचे नमुने सापडले आहेत आणि त्यांचं प्रमाण किती आहे, हेसुद्धा शोधण्यात आम्हाला यश मिळालं आहे."
 
ते पुढे सांगतात, "याचा फायदा असा आहे की, लोकांकडे जाण्यापेक्षा तुम्ही सांडपाणी एकत्र करून त्याची चाचणी करू शकता. यातील व्हायरसचं प्रमाण पाहून संबंधित भागात व्हायरसचा संसर्ग किती झाला आहे याची माहिती तुम्हाला मिळू शकते."
 
विश्वासार्हता किती?
ज्या भागातील सांडपाण्याची चाचणी करण्यात आली, तेथील जवळपास 6 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो, असं CCMBनं अहवालात म्हटलं आहे.
 
तेलंगणा सरकारनं प्रसिद्ध केलेले आकडे आणि CCMB च्या आकड्यांमध्ये तफावत दिसते. त्यामुळे हे सर्वेक्षण किती विश्वासार्ह आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
 
राकेश मिश्रा सांगतात, "सरकारनं प्रसिद्ध केलेले आकडे वेगळे नाहीयेत. सरकारनं 24,000 चाचण्या केल्या, त्यापैकी 1,700 जण पॉझिटिव्ह आढळले. सरकारनं केलेली टेस्ट ही रॅपिड अँटिजन टेस्ट आहे. ही टेस्ट कमी संवेदनशील असते. याचा अर्थ आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली असती, तर 2,000 ते 2,400 जण पॉझिटिव्ह आढळले असते."
 
राकेश मिश्रांनी पुढे म्हटलं, "आमच्या अभ्यासानुसार 2 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण संख्येच्या 5 टक्के इतका हा आकडा आहे. पुणे, मुंबई आणि दिल्लीतील सिरोलॉजिकल सर्व्हे पाहिले तर तिथं 20 टक्क्यांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पुण्यात तर काही भागांमध्ये 50 टक्क्याहून अधिक जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.
 
ते सर्वेक्षण छोट्या भागांमध्ये करण्यात आले होते, पण त्यातील आकड्यांवर अतिशयोक्तीनं चर्चा करण्यात आली, हे मी तुम्हाला सांगू शकतो. पण, आम्ही तर सांडपाण्यात जे काही मिळत आहे, त्याची गोष्ट करत आहोत. पाण्यात अस्तित्वात असलेल्या घटकांवर हा सर्व्हे आधारित आहे."
 
"ही टेस्टिंगची स्वस्त आणि विश्वासार्ह पद्धत आहे. यासाठी तुम्हाला दहा हजार लोकांचे सॅम्पल घेण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ 10 सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाऊन सॅम्पल गोळा करायचे आहेत आणि मग तुम्ही त्यावरून संपूर्ण शहराविषयीची माहिती देऊ शकता. ही एकदम विश्वासार्ह पद्धत असून युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील शहरांत कोरोनाच्या संसर्गाची माहिती जाणून घेण्यासाठी याचा वापर केला जात आहे," असं राकेश मिश्रांनी म्हटलं.
 
इतर ठिकाणीही असाच प्रयोग?
पण, हैदराबादस्थित CCMB दुसऱ्या शहरांमध्ये अशा पद्धतीची टेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का?
 
राकेश मिश्रा सांगतात, की सांडपाणी टेस्ट करून कोरोनाचा संसर्ग किती झाला आहे, याची माहिती भारताच्या इतर शहरांतही मिळवता येऊ शकते.
 
ते पुढे सांगतात, "चंदीगढसारख्या शहरात आमच्यासोबत अशा काही संस्था जोडल्या आहेत, ज्या याप्रकारची टेस्टिंग करू शकतात, तसंच यासाठी आम्ही आमच्याकडील माहिती त्यांना पुरवत आहोत."
 
"नागपूरमधील NEERI संस्थेकडे सांडपाण्यावर संशोधन करण्याची क्षमता आहे, पण ते आताच असं कोणतंही संशोधन करू शकत नाही. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये असा सर्व्हे करण्यात यावा, अशी आमची इच्छा आहे. यासाठीची तांत्रिक माहिती शेअर करायला आम्ही तयार आहोत. केवळ कोरोना व्हायरसच नाही, तर सांडपाण्यातून इतर आजारांचीही माहिती मिळवता येऊ शकते."
 
याप्रकारच्या स्वस्त उपायांतून कोरोनाचा संसर्ग शहरात किती प्रमाणात झाला आहे आणि येणाऱ्या काळासाठी आपण किती तयार आहोत, याची माहिती जाणून घेता येते.
 
पण, सांडपाण्यात कोरोनाचे अंश सापडल्यानं लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो का?
 
राकेश मिश्रा सांगतात, "आम्हाला पाण्यात कोरोनाचे अंश सापडले आहेत, पण ते RNAचे विखुरलेले तुकडे आहेत. ते संसर्गजन्य नाहीत, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होतो. त्यामुळे तुम्हाला पावसाचं पाणी किंवा सांडपाण्याला घाबरण्याची गरज नाही."
 
सांडपाण्यातील नमुने किती भयंकर?
आतापर्यंत कोरोना व्हायरसविषयी जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार कोरोनाचे अनेक प्रकार (स्ट्रेन) अस्तित्वात आहेत. यापैकी काही प्रकार अत्यंत धोकादायक, तर काही कमी धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. पण, मग सांडपाण्यातील कोरोनाचे नमुने किती धोकादायक आहेत?
 
राकेश मिश्रा यांच्या मते, "कोरोनाचा व्हासरसचं स्वरूप वेळोवेळी बदलत आहे. आम्ही अनेकदा परीक्षण केलं आहे आणि त्याचा पॅटर्नही पाहिला आहे. या व्हायरसकडून जितकी अपेक्षा होती, तितका तो बदलत आहे. खरं तर त्यात कमी बदल होत आहे, पण प्रत्येकच बदल काही धोकादायक नसतो."
 
"अनेक बदल तर व्हायरससाठीच धोकादायक ठरतात आणि ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे. साधारणपणे असं होतं की, व्हायरस बदलत जातो आणि मग तो माणसांसाठी हळूहळू कमी धोकादायक होत जातो. सध्या तरी कोरोनाविषयी असं म्हटलं जाऊ शकत नाही. आम्हाला दक्षिण-पूर्व आशिया आणि दक्षिण भारतात कोरोना व्हायरसचा A3i स्ट्रेन आढळला आहे आणि कदाचित तो कमकुवत आहे. तर जगभरात कोरोनाचा A2A हा प्रकार समोर आला आहे. सध्या कोरोना अत्यंत धोकादायक स्थितीत नाहीये, तर स्थिर अवस्थेत आहे, असं आपण म्हणू शकतो."
 
ते पुढे सांगतात, "कोरोना व्हायरस हवेत कशाप्रकारे पसरतो आणि दवाखान्यासारख्या ठिकाणी त्याचा किती संसर्ग होऊ शकतो, याविषयीसुद्धा संशोधन सुरू आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यास मदत होईल."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती