उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे तीन अर्थ
मंगळवार, 8 जून 2021 (22:03 IST)
नीलेश धोत्रे
'आमचं नातं तुटलेलं नाही,' हे उद्गार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत मंगळवारी (8 जून 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केलं आहे. पत्रकारांनी मोदींच्या भेटीबाबत वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण केल्यावर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय.
'तुमची मोदींशी वन टू वन भेट झाली का', या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही राजकीयदृष्ट्या त्यांच्याबरोबर नाहीत, पण त्याचा अर्थ असा नाही की आमचं नातं तुटलं आहे. त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला नव्हतो गेलो. मी माझ्या या दोन सहकाऱ्यांना म्हटलं की मला पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं आहे, तर त्यात चुकीचं काय आहे?"
पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही मिनिटं एकट्यात चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीचे 3 प्रमुख राजकीय अर्थ निघतात.
खरंतर राज्यात पुन्हा एकदा पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
यावेळी 12 मागण्या पंतप्रधानांसमोर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यात मराठा आरक्षण, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण हे सुद्धा मुद्दे होते.
"पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. या भेटीत कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधान आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल," अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
1. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्राकडे टोलावला
सुप्रीम कोर्टानं 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द ठरवत राज्यांना 102 व्या घटना दुरुस्तीनंतर असं आरक्षण देण्याचे अधिकार नसल्याचं म्हटलं. त्यानंतर आता केंद्र सरकारचं आरक्षण देऊ शकतं अशी भूमिका उद्धव ठाकरे सरकारनं घेतली होती. त्याच दरम्यान 13 मे रोजी 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार आहेत, असं म्हणत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली.
केंद्रानं याचिका दाखल केल्यानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू पुन्हा राज्याकडे टोलवला. पण मोदींची भेट घेऊन इंद्रा सहानी निकालानंतर सुप्रीम कोर्टानं आरक्षणावर आणलेली 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी घटना दुरुस्तीची मागणी करुन उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तो चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलावला आहे.
"केंद्र सरकारने मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षणासंदर्भात न्याय मागण्या विचारात घेऊन भारतीय राज्य घटनेच्या कलम 15 (4) आणि 16 (4) मध्ये घटनात्मक दुरुस्ती करण्यासाठी पाऊले टाकावीत, जेणे करून इंद्रा सहानी प्रकरणामुळे 50 टक्के आरक्षणाचा मुद्दा शिथिल होईल," अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
2. ओबीसी आणि SC आरक्षणाचे मुद्दाही केंद्राच्या कोर्टात
ओबीसी समाजाला पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळत होतं. पण ते आता सुप्रीम कोर्टानं स्थागित केलंय.
राज्यातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जवळजवळ 56 हजार जागांवर याचा परिणाम होईल, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याआधी Rigorous Empirical Inquiry (कठोर अनुभवजन्य संशोधन) करा, असं कोर्टानं म्हटलंय. आणि त्यासाठी जणगनणेतल्या माहितीची आवश्यकता आहे.
त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी 2021 च्या जनगणनेमध्ये ओबीसींचीही जनगणना करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
त्यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारला जनगगणना आणि पर्यायाने नरेंद्र मोदी सरकारकडे बोट दाखवता येणार आहे.
शिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राबरोबर इतरही राज्यांचा आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखं सर्वंकष धोरण ठरवण्याची मागणी करून हा विषयही केंद्राच्या कोर्टात टोलावला आहे.
3. 'मोदी-ठाकरेचं नातं अतूट'
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवडीचा मुद्दासुद्धा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडण्यात आला.
12 पैकी 11 मुद्दे हे सरकार आणि सामान्य लोकांशी संबंधीत होते. पण 12वा मुद्दा मात्र थेट महाविकास आघाडीच्या काळजाला हात घालणारा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या मुद्द्यावरून शिवसेना सतत राज्यपालांवर टीका करत आहे. पण ज्या आघाडीसाठी शिवसेना हे करत आहे, त्याआघाडीला मात्र उद्धव ठाकरे यांनी एक मोठा संदेश दिला आहे. तो म्हणजे त्यांचं आणि नरेंद्र मोदी यांचं नातं अतूट असल्याचा.
मधल्या काळात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यावेळी काँग्रेसनं शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसून आली. नाना पटोले, भाई जगताप, झिशान सिद्दिकी यासारख्या नेत्यांनी तर थेट शिवसेनेला शिंगावर घेतलं.
परिणामी, नेहमीप्रमाणे राज्यातलं सरकार पडणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्या चर्चांना उद्धव ठाकरेंनी यांनी एकप्रकारे नातं अतूट असल्याचं सांगून उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर कायमच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. कधी त्यांची नावं घेऊन टीका केली आहे तर कधी नावं न घेता. पण नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं मात्र त्यांनी कायम टाळलं आहे.
लोकसत्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमातसुद्धा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे टीका केली पण मोदींबद्दल चांगले उद्गार काढले.
102व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावरून केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचं आणि लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी उचलेलेल्या पावलाची उद्धव ठाकरे यांनी याच नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रशंसा करत आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही दुसरी नरेंद्र मोदी यांची भेट होती. पहिली भेट त्यांनी 21 फेब्रुवारी 2020ला घेतली होती. पण गेल्या दीड वर्षांत बरंच राजकारण घडलं आहे. पहिल्या भेटीत त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरेसुद्धा होते. यावेळच्या भेटीत त्यांच्याबरोबर अजित पवार आणि अशोक चव्हाण होते.
दुसऱ्या भेटीत ते आघाडीचे नेते म्हणून सुद्धा नेतृत्व करत होते आणि या दुसऱ्या भेटीवेळी मोदी-ठाकरेंमध्ये खासगीत चर्चासुद्धा झालीय. त्यानंतर लगेचच झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले - 'मोदींचं आणि माझं नातं तुटलेलं नाही.'