सर्वांत मोठ्या डायनासोरच्या उंची आणि लांबीबाबत नवे संशोधन समोर

मंगळवार, 8 जून 2021 (19:23 IST)
ऑस्ट्रेलियामध्ये 2007 साली डायनासोरचे अवशेष सापडले होते. आता हे सर्वांत मोठे डायनासोर होते असं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे.
 
जगभरातील सर्वांत मोठ्या 15 डायनासोरमध्ये 'द सदर्न टायटन' किंवा 'ऑस्ट्रालोटायटन कूपरनसिस'चा समावेश होतो असं संशोधकांनी जाहीर केलं आहे. तज्ज्ञांच्या मते हे टायटनसोर 6.5 मीटर उंच म्हणजे 21 फूट उंच आणि 30 मीटर म्हणजे अंदाजे 100 फूट लांब असावेत. एका बसची लांबी अंदाजे 30 ते 35 फूट असते म्हणजेच हा डायनासोर अंदाजे तिप्पट लांब होता.
 
नैऋत्य क्वीन्सलँडमध्ये एका शेतात त्याचा सांगाडा सापडला होता. जवळपास एका दशकाहून अधिक काळ शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करत होते. त्यावेळेस तो इतर सॉरोपॉड्सपेक्षा वेगळा असल्याचं लक्षात आलं. सोरोपॉड म्हणजे हिरव्या वनस्पतींवर जगणारे महाकाय डायनासोर. त्यांचं डोकं लहान असे, मान एकदम लांबुळकी असे, शेपट्या जाड आणि मोठ्या असत आणि त्यांचे पाय खांबांसारखे असत.
हे डायनासोर क्रेटेसियस काळामध्ये म्हणजे सुमारे 9.2 ते 9.6 कोटी वर्षांपूर्वी या खंडावर असावेत.
 
त्याचे अवशेष कूपर खाडीजवळ सापडले होते म्हणून त्याला कूपर असं नाव दिलं होतं.
 
त्याची हाडं अत्यंत दुर्गम प्रदेशात सापडली होती तसेच त्यांचा आकार आणि त्यांची सध्याची स्थिती यामुळे त्यावर करण्यात आलेल्या संशोधनाची प्रक्रिया लांबली होती.
 
मात्र अनेक अवशेष सुस्थितीत होते असं क्वीन्सलँड म्युझियम आणि एरोमान्गा नॅचरल हिस्ट्री म्युझियमने स्पष्ट केलं.
ऑस्ट्रालोटायटन हे डायनासोर विंन्टाटोटियन, डायमान्शिनासोरस, सॅव्हानासोरस या सोरोपॉडसच्या प्रजातींशी अगदी मिळतेजुळते होते. या सोरोपॉड्सच्या महाकाय कुटुंबातले ते सदस्य असावेत असं संशोधन करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. स्कॉट हॉकनल यांनी सांगितले.
 
एरोमान्गाच्या एका शेतात 2007 साली ही हाडं सापडली होती. ते रॉबिन आणि स्टुअर्ट मॅकेन्झी या डायनासोर संशोधकांच्या मालकीचं होतं.
 
स्टुअर्ट मॅकेन्झी म्हणाले, "त्या डायनासोरचे पहिलं हाड क्वीन्सलँड म्युझियमबरोबर केलेल्या उत्खननात माझ्या मुलाला सापडलं ही कल्पनाच भन्नाट वाटते. ना नफा तत्वावरचं म्युझियम विकसित करायला सर्वांनीच मदत केली आहे."
 
या नव्या शोधाचं क्वीन्सलँड राज्य सरकारनं स्वागत केलं आहे. क्वीन्सलँड म्युझियम नेटवर्कचे मुख्य कार्यकारी डॉ. जीम थॉमसन म्हणाले, डायनासोर शोधात ऑस्ट्रेलिया हा सर्वात शेवटचा मुक्काम होता. आता क्वीन्सलँड ही ऑस्ट्रेलियाची पाषाणयुगीन राजधानी होऊ पाहातेय. अजून बरेच शोध लागण्याची गरज आहे."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती