आग्र्यात रुग्णांनी हॉस्पिटल सोडावं म्हणून ऑक्सिजन पुरवठाच बंद केला?

मंगळवार, 8 जून 2021 (14:22 IST)
उत्तर प्रदेशमधील आग्रास्थित पारस हॉस्पिटलच्या संचालकांचा एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओमध्ये ते म्हणतात की, "हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज करण्यासाठी पाच मिनिटांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा रोखला गेला होता."
 
हॉस्पिटलचे संचालक पाच मिनिटांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा रोखण्याच्या या गोष्टीला 'मॉक ड्रिल' म्हणत आहेत.
 
पारस हॉस्पिटलमध्ये 26-27 एप्रिलच्या रात्री ऑक्सिजनची कमतरता भासल्यानं 22 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांनी तेव्हाही हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप करत, गोंधळ घातला होता. मात्र, हॉस्पिटल, पोलीस आणि प्रशासनानं हे आरोप फेटाळले आहेत.
 
आग्र्याचे जिल्हाधिकारी पी. एन. सिंह यांच्या मते, "26 एप्रिलला पारस हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या 97 रुग्णांना भर्ती करण्यात आलं होतं. त्यातील चौघांचा मृत्यू झाला."
 
"व्हायरल झालेल्या व्हीडिओच्या सत्यतेबाबत संशय आहे, तरीही चौकशी केली जाईल," असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
जवळपास दीड महिन्यांनंतर पारस हॉस्पिटलचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानं गदारोळ झालाय. व्हीडिओमध्ये हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ. अरिंजय जैन त्यावेळची पूर्ण घटना स्वत:च सांगत आहेत.
 
या व्हीडिओला अद्याप कुणी दुजोरा दिला नाहीय.
 
डॉ. अरिंजय जैन म्हणतात, "ऑक्सिजनची कमतरता होती. आम्ही लोकांना सांगितलं की, आपापल्या रुग्णाला घेऊन जावं. मात्र, त्यासाठी कुणीच तयार नव्हता. त्यामुळे मी एखाद्या मॉक ड्रिलसारखा एक प्रयोग केला. 26 एप्रिलच्या सकाळी 7 वाजता ऑक्सिजन पुरवठा आम्ही रोखला.
 
22 रुग्ण श्वास घेता येईना म्हणून धापा टाकू लागले आणि त्यांचं शरीर निळं पडू लागलं. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की, ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, तर हे वाचू शकणार नाहीत. त्यानंतर आम्ही आयसीयूमध्ये असलेल्या उर्वरीत 74 रुग्णांच्या नातेवाईकांना आपापलं ऑक्सिजन सिलेंडर आणण्यास सांगितलं."
 
या व्हीडिओत समोर बसलेली व्यक्ती 22 लोकांचा जीव गेला याला दुजोरा देते.
 
ही संपूर्ण चर्चा 26-27 एप्रिल रोजी समोर आलेल्या ऑक्सिजन संकटाच्या बाबतीतली आहे.
 
आग्र्याच्या पारस हॉस्पिटलमध्ये 'मॉक ड्रिल' 26 एप्रिलच्या सकाळी 7 वाजता करण्यात आली होती. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये 94 रुग्ण होते आणि मॉक ड्रिलनंतर केवळ 74 रुग्ण बचावले होते.
 
हॉस्पिटलचे संचालक डॉ. अरिंजय जैन यांचे चार व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. यात ते ऑक्सिजन संकटाच्या दिवशी काय घडलं ते सांगत आहेत.
 
दरम्यान, स्थानिक माध्यमांशी बोलताना डॉ. जैन यांनी आरोप फेटाळले आणि हा व्हीडिओ चुकीच्या अर्थानं व्हायरल होत असल्याचं म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती