महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा येत्या 10 जून पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिक्षा घेण्यात येईलअशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्या बद्दल प्रयत्न (attempt) मोजण्यात येऊ नयेत अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड-19 परिस्थितीच्या अनुषंगाने, विद्यार्थी दि.10 जून 2021 पासुन सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या हिवाळी-2020 लेखी परीक्षेस कोविड-19 आजाराचा अहवाल सकारात्मक (Positive) आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची सदर हिवाळी-2020 लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, विशेष परीक्षा घेण्यात येईल. सदरील परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न (Attempt) ग्राहय धरला जाणार नाही. विशेष परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापिठाच्या परिक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकतात, तसेच जे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहण्यास इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात यावी, वसतिगृहाच्या मेस मध्ये भोजनाची सोय करण्यात यावी. वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात यावे आणि सर्व प्रकारची काळजी घेऊनच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असेही वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना कळविण्यात आले आहे.