गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (12:01 IST)
स्वच्छता राखणे हे आपले सामाजिक आणि संवैधानिक कर्तव्य असून त्याचे पालन आपण सर्वांनी मनापासून करायला हवे. स्वच्छता ही सवय व्हायला हवी, असे आवाहन प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी यांनी केले.
 
आज त्यांच्या हस्ते गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा आरंभ करण्यात आला. श्री.त्यागी म्हणाले की, स्वच्छता ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे. 90 टक्के आजार हे प्रदुषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे जलस्त्रोतांचे संरक्षण करणे, पाण्याची स्वच्छता राखणे अगत्याचे झाले आहे. या उद्देशानेच आज आपण सर्वजण गिरगाव चौपाटी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांनी मनापासून यात सहभागी व्हावे, ज्यांना जिथे शक्य असेल तिथे त्यांनी आपल्या नद्या आणि जलस्त्रोतांच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
 
मुंबईतील गिरगाव चौपाटीच्या स्वच्छतेसाठी सुरुवात  सरसावले शेकडो हात
 
पर्यटकांच्या गर्दीनं फुलून जाणारी गिरगाव चौपाटी आज तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात न्हाऊन निघाली होती. शेकडो हात गिरगाव चौपाटी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले होते. कुणी प्लास्टिक गोळा करत होतं, कुणी कचरा उचलत होतं, कुणी तुटलेल्या चपला उचलत होतं तर कुणी आणखी काही. प्रत्येकजण उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता. विद्यार्थ्यांनी आपले ग्रुप तयार करून कामं वाटून घेतली. काहींनी जसा कचरा उचलला तर काहींनी बॅगांमध्ये भरलेला कचरा चौपाटीवर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कुंभात नेऊन टाकला.
 
समुद्र आणि मुंबईकर यांचं नातंच विलक्षण. आपला समुद्र स्वच्छ झाला पाहिजे, समुद्र किनारा स्वच्छ झाला पाहिजे या एकाच ध्येयाने ही सगळी मंडळी काम करत होती. यात सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर एन.एस.एस, एन.सी.सीचे विद्यार्थी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य, सामाजिक वनीकरण शाखेचे तसेच वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
 
हे सर्वजण एकत्र आले होते ते सागरी किनारा स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने. पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत  दि. 11 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधीत गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. त्याचा आरंभ आज प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी यांनी आज केला. त्यावेळी ठाण्याचे विभागीय वन अधिकारी जितेंद्र रामगांवकर आणि सामाजिक वनीकरण शाखेतील इतर अधिकारी उपस्थित होते.
 
या मोहिमेमध्ये समुद्र किनारा स्वच्छता, समुद्रीय परिसंस्थेचा परिचय, छायाचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन अशा स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. त्यागी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आतापर्यंत उरण, गणपतीपुळे, तारकर्ली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता सामाजिक वनीकरण शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. आजपासून पुढील सात दिवस गिरगाव चौपाटीची स्वच्छता केली जाईल.
 
यापूर्वीही कांदळवन कक्षाच्यावतीने स्वच्छ कांदळवन अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली होती. याअंतर्गत मुंबई, नवी मुंबई बांद्रा, वर्सोवा, दहिसर, शिवडी, ऐरोली, भांडूप, गोराई, वाशी अशा विविध ठिकाणच्या कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये 11.03 कि.मी समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील 8 हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. 25 हजार लोकांनी यात सहभाग घेतला होता. “शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे सर्वात मोठे पाऊल या निमित्ताने पडले. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती