मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी मीडियाने आदर पुनावाला यांनाही काही प्रश्न विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. सीरमला लागलेल्या कालच्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरसचंही मोठं नुकसान झालं आहे, असं आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं.
तसेच कोव्हिशिल्ड लस दुसऱ्या ठिकाणी होती. त्यामुळे या लस सुरक्षित आहेत. तसेच या लसीच्या उत्पादनावरही कोणताही परिणाम झालेला नाही. ज्या ठिकाणी आग लागली तिथे कोणत्याही व्हॅक्सिनची निर्मिती होत नव्हती. केवळ भविष्यात या ठिकाणी लस ठेवण्यासाठी या इमारतीचं काम सुरू होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.