बहुचर्चित नवा पत्री पूल वाहतूकीसाठी २५ जानेवारीला खुला होणार

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (21:56 IST)
मुंबईतील कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा बहुचर्चित नवा पत्री पूल वाहतूकीसाठी २५ जानेवारी रोजी खुला केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूलाचे ऑनलाईन लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या ऑनलाईन सोहळ्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.
 
जुना पत्रीपूल हा ब्रिटीशकालीन होता. हा ऐतिहासिक पूल वाहतूकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडीटमध्ये उघड झाले होते. ऑगस्ट २०१८ मध्ये हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर मोठी यंत्रणा लावून नोव्हेंबर २०१८ मध्ये पूलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर या पूलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. पूलाच्या कामाला लॉकडाऊनचाही सामना करावा लागला. १०० वर्षे जुना असलेल्या पत्री पूलाच्या जागी नव्याने उभारताना ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर तयार करण्यात आला. हा गर्डर हैद्राबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आला. कोरोना काळात हा गर्डर आणण्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली.
 
अनंत अडचणीवर मात करीत पूलाचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार शिंदे यांनी कंबर कसली. या  पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती