नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे धाडसत्र हे सुरूच असून नाशिक शहरासह कळवण मालेगाव या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धाडसत्रामध्ये तेल, न्यूट्राक्यूटिकल, तसेच मिठाईसाठी अन्य राज्यातून मागवलेला मावा यासारखे पदार्थ जप्त करून संबंधित दुकान चालकांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. एफडीएच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत दि. 3 ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी मालेगाव येथील सोमवार वार्ड मधील मे. सैफी मेडिकल एजन्सीज येथे धाड टाकून विक्रीसाठी साठविलेल्या न्यूट्राक्यूटिकलचा साठा लेबलदोषयुक्त आढळल्याने त्याच्या 175 बॉटल्स (किंमत 24 हजार 940 रुपये) जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात दिला असून, याप्रकरणी उत्पादकापर्यंत तपास करण्यात येत आहे. विक्रेत्याने कायद्यांच्या तरतुदींचे पालन करूनच व्यवसाय करावा; अन्यथा प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी ही कारवाई केली.
दुसर्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनामार्फत दि. 28 जुलै रोजी सुभाष पेठ, कळवण येथील प्रसाद प्रोव्हिजन येथे सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी भेट दिली असता त्याठिकाणी अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत परवाना नसल्याचे आढळून आले, तसेच सुटे खाद्यतेल विक्रीस बंदी असताना त्या ठिकाणी खुल्या स्वरूपात 1 टन क्षमतेच्या टाकीतून नळाद्वारे खुल्या खाद्यतेलाची विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने देशमुख यांनी त्यातून अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नमुना घेऊन 57 हजार 540 रुपये किमतीचा 548 किलो खाद्यतेल साठा जप्त करून विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने व्यवसाय बंदबाबत विक्रेत्यास नोटिस बजावण्यात आली आहे.
प्रशासनातर्फे खाद्यतेल विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले आहे, की कोणीही खुल्या स्वरूपात रिपॅकिुंग खाद्यतेलाची विक्री करू नये, तसे आढळल्यास प्रशासनामार्फत कारवाई घेण्यात येईल. ही कारवाई योगेश देशमुख यांनी केली.
तिसर्या कारवाईत नाशिक शहरातील बरेच मिठाई विक्रेते हे परराज्यातून येणार्या स्पेशल बर्फीचा वापर पेढा, बर्फी, मिठाई व तत्सम पदार्थ बनविण्याकरिता करीत असल्याची माहिती मिळाल्याने दि. 2 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयातील अधिकार्यांनी विर ट्रॅव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस, द्वारका, नाशिक येथे पाळत ठेवली असता तेथे आलेल्या एका खासगी प्रवासी बसमधून नाशिक येथील मे. यशराज डेअरी अॅण्ड स्वीटस, उपनगर (नाशिक) व शांताराम बिन्नर (रा. आडवाडी, ता. सिन्नर) यांनी गुजरातमधून गोड मिठाई व हलवा हे अन्नपदार्थ मागविले असल्याचे आढळून आले. कायद्यानुसार खासगी प्रवासी बसद्वारे व्यावसायिक साहित्य किंवा अन्नपदार्थ यांची वाहतूक करता येत नाही.
या निकषानुसार संबंधित विक्रेत्याकडून वरील अन्नपदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित 130 किलोचा साठा (किंमत 22 हजार 300 रुपये) जप्त करण्यात आला. नाशिक विभागातील सर्व खासगी बस वाहतूकदारांनी अन्नपदार्थाची वाहतूक करू नये, असे आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे नाशिक शहरातील मिठाई विक्रेता संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन विक्रेत्यांना गुजरात बर्फीचा वापर करून पेढे व मिठाई बनवून त्यांची विक्री करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकोरी श्रीमती सुवर्णा महाजन व प्रमोद पाटील यांनी केली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या सर्व कारवाईला नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी मार्गदर्शन केले.