“महालक्ष्मी रेसकोर्स मुद्द्यावर कागदपत्रांसहित लवकरच बोलणार आहे. हे आता बिल्डर, कॉन्टॅक्टर सरकार झालं आहे. माझी मुंबई विकू नका, स्वतःला विकलं तेव्हढं पुरे, माझ्या मुंबईचं ATM करू नका”, अशी टीका शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून मुंबईला लुटलं जात आहे. ज्या 400 किमीचे टेंडर जे तीन वर्षात काढायला हवे, ते एका वर्षात काढले असल्याचंही ते म्हणाले. गद्दार स्थानिक आमदार यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला. पण, अद्याप कोणतीही कारवाई नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा नाही. राज्यपालांवर कारवाई नाही असं आदित्य म्हणाले. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, “खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. 5 हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे. 450 किमी 6084 कोटींचं टेंडर आहे, फेब्रुवारीत काम सुरु केलं तरी काम कधी होणार? रस्त्याखाली 42 युटीलिटी,16 एजन्सी काम करतात. वाहतूक पोलीस परवानगी आवश्यक. बीएमसीचा पैसा दुसऱ्या कमिटीला देऊ शकतात काय? 400 किमी रस्ते शक्यच नाही”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.