महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी येथे वस्तीवर दरड कोसळली. या गावातील ढिगाऱ्यातून आणखी पाच मृतदेह सापडल्याने शुक्रवारी मृतांची संख्या 21 पोहचली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सकाळपासून ज्या पाच बळींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यापैकी तीन पुरुष आणि दोन महिला असल्याचे त्यांनी सांगितले. 21 मृतांमध्ये 6 महिने ते चार वर्षे वयोगटातील चार मुले आणि दोन भावंडांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकांनी पहाटे 6.30 च्या सुमारास डोंगराळ प्रदेशात असलेल्या भूस्खलनाच्या ठिकाणी त्यांचे शोध आणि बचाव कार्य पुन्हा सुरू केले. स्थानिक ग्रामस्थ आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे नातेवाईक बचाव पथकाला मदत करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
बुधवारी रात्री मुंबईपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टी जिल्ह्यातील डोंगर उतारावर असलेल्या इर्शालवाडी या आदिवासी गावात दरड कोसळली. गुरुवारपर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. गावातील एकूण 228 रहिवाशांपैकी 21 जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर 93 रहिवाशांचा शोध लागला आहे.
मात्र, एकूण 114 गावकऱ्यांचा शोध घेणे बाकी आहे. त्यामध्ये गावाबाहेर लग्नासाठी किंवा भात लागवडीच्या कामासाठी गेलेल्या लोकांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.