अरबी समुद्रात तयार होत असलेलं चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार नाही, असं भाकित वेधशाळेनं वर्तवलं आहे. मात्र या वादळी हवामानामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात वेगवान वारे आणि पावसाचा धोका कायम आहे.
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, पुढच्या दोन दिवसांत, म्हणजे 16 मे पर्यंत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होईल असं हवामान खात्याचा अंदाज सांगतो.
18 मे पर्यंत हे वादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याकडे सरकेल असं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं आहे. वादळ तयार होऊन गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे.या वादळाचा प्रभाव भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आतापासूनच दिसू लागला असून केरळ, कर्नाटकच्या किनारी प्रदेशात ढगाळ हवामान कायम आहे. महाराष्ट्रातही 16 आणि 17 तारखेला किनाऱ्याजवळील प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
'महाराष्ट्रालाही धोका होता'
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
याआधी, रायगडच्या उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं होतं, "मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे."