सिने जगतातील अभिनेते-अभिनेत्री तसेच जागतिक दर्जाचे खेळाडू, बडे उद्याेजक यांना अलिबागच्या साैदर्याची भुरळ पडली आहे. काहीच महिन्यापूर्वी सिनेतारका दीपिका पादुकाेण आणि वंडरबाॅय रणवीर सिंग यांनी अलिबाग येथे जमिन घेतली हाेती. त्या पाठाेपाठ आता भारतीय संघाचा आघाडीचा खेळाडू राेहित शर्मा देखील अलिबागकर झाला आहे. रोहित शर्माने अलिबागमध्ये चार एकर जमिन तब्बल नऊ काेटी रुपयांना खरेदी केली आहे. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर त्याने माेजक्याच नातेवाईक आणि मित्र परिवारासह जमिनीचे पुजन केले. त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद हाेता.
अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरा जवळील विर्त-सारळ या गावात रोहित शर्माने ४ एकर जागेसाठी तब्बल ९ कोटी रुपये माेजले आहेत. जमिनीचा खरेदी व्यवहार करण्यासाठी रोहित शर्मा सपत्नीक आज अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आला होता. रोहित शर्मा आल्याचे कळताच त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी माेठ्या संख्येने गर्दी केली होती.
क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि वृषभ पंत हे देखील लवकरच अलिबागकर होणार आहेत. अलिबागमध्येच ते जागा आणि रो हाऊस खरेदी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलिबाग तालुका हा निसर्गाने नटलेला असल्याने अनेकांना त्याच्या सौंदर्याची भुरळ पडत असते. राजकीय नेते, अभिनेते, उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती हे अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित आगरकर, विराट कोहली हे अलिबागकर झाले आहेत.