सप्तशृंगी देवीच्या गडावर येत्या 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान होणार चैत्रोत्सव

शनिवार, 25 मार्च 2023 (21:12 IST)
नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्यदैवत अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी आदिमायेच्या गडावर येत्या 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान चैत्रोत्सव होणार आहे. यासाठी न्यासाच्या वतीने विविध पूजा व विधींसाठी तयारी झाली असून, ग्रामपंचायतसुद्धा भाविकांच्या व्यवस्थेसाठी पाणी व स्वच्छतेसाठी नियोजन करीत आहे.
 
दि. 30 मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ट्रस्टचे विश्‍वस्त, तहसीलदार, सरपंच, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ट्रस्ट कार्यालयापासून मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात येणार असून, प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हे सकाळी साडेसात वाजता देवीची पंचामृत महापूजा व आरती करणार आहेत. दुपारी 12 वाजता देवी मंदिरात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
 
चैत्रोत्सवादरम्यान मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार असून यादरम्यान दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री भगवतीची आरती व पंचामृत महापूजा होणार आहे. दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भगवती शिखरावरील ध्वजपूजन व दुपारी साडेतीन वाजता पारंपरिक देवीभक्त गवळी पाटील यांच्या उपस्थितीत ध्वज मिरवणूक व रात्री बाराच्या सुमारास सप्तशृंग शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता भगवतीची पक्षालय पंचामृत महापूजा करून सकाळी 11 ते 5 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
वर्षातून दोन वेळा यात्रा भरणार्‍या सप्तशृंगी देवीच्या गडावर चैत्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या दरम्यान खान्देशातील 15 ते 20 लाख भाविक गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी हजेरी लावतात. असा हा उत्सव 30 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत साजरा होणार आहे.
 
यात्रेदरम्यानच्या तयारीसाठी तहसीलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात नियोजन बैठक घेण्यात येऊन यात्रेसंबंधित महत्त्वाच्या विभागांना यात्रा तयारीसाठी सूचना देऊन जबाबदारी देण्यात आल्या आहेत. व येत्या शुक्रवार ते सोमवारदरम्यान जिल्हाधिकारी गडावर आढावा बैठक घेऊन विभागवार तयारीचा आढावा घेणार आहेत.
 
ग्रामपंचायतीच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा – ग्रामपंचायत प्रशासनाने गडावरील हॉटेल व्यावसायिकांना शुद्ध पाणी वापरण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यामध्ये हॉटेलमध्ये अशुद्ध पाणी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. टँकरच्या साह्याने अशुद्ध पाणी वापरून पाण्याचेही पैसे घेणार्‍या हॉटेलचालकांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती