भाजपच्या राज्यातील नेत्यांनीच केंद्राला पत्र पाठवून ईडीचा ससेमिरा मागे लावला; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:28 IST)
सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या राज्यातील नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
 
आमदार रोहित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि खासदार ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आले आहे. खुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहे. या प्रकरणावर बोलत असताना रोहित पवार यांनी नवा दावा केला आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला.
 
रोहित पवार यांनी जळगावात भाजपच्या नेत्यांना चांगलेच लक्ष्य केले. गेल्या दोन वर्षांच्या काळात विरोधकांनी फक्त राजकारण केले. आजही राज्याचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. एवढेच काय तर, जीएसटी परताव्याचे ३५ हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहेत. राज्य सरकारचा हा हक्काचा पैसा अजून केंद्राकडून मिळालेल्या नाही. हा पैसा मिळवण्यासाठी विरोधकांनी साध एक पत्र तरी केंद्राला लिहिलंय का? असा सवाल ही आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती