भाजप ओबीसींच्या आरक्षणाविरोधात : ऍड. प्रकाश आंबेडकर

शनिवार, 9 एप्रिल 2022 (21:38 IST)
कोल्हापूर केंद्रातील भाजप सरकारचा ओबीसींच्या आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच या सरकारकडून जात निहाय गणना केली जात नाही. परिणामी ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आवश्यक तो डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर होऊ शकत नाही. त्यामुळे भाजप, मोदी सरकारच ओबीसींचे खरे विरोधक आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
 
येथील दसरा चौकात शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. शाहीद शेख यांच्या प्रचारार्थ ऍड. आंबेडकर यांची सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या धोरणांवर हल्ला केला. ते म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले. आता त्यांचे शैक्षणिक आरक्षणही रद्द व्हावे, यासाठी याचिका दाखल झाली आहे. तसे झाले तर ओबीसींच्या मुलांच्या शिक्षणावर गदा येणार आहे. सरकारमधील श्रीमंत मराठय़ांनी गरीब मराठय़ांच्या आरक्षणाची वाट लावली. उच्च न्यायालयात वैध ठरलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात कसा रद्द होतो? याचा विचार मराठा बांधवांनी केला पाहिजे. ओबीसी आणि मराठा बांधवांनी आरक्षणाचे विरोधक कोण? हे ओळखून पावले टाकली पाहिजे. राज्य घटना टिकावयाची असेल तर लढावे लागेल, विरोधकांचा सामना करावा लागेल, त्यासाठी सज्ज व्हावा, असे आवाहनही ऍड. आंबेडकर यांनी केले. यावेळी रेखाताई ठाकुर यांच्यासह वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती